Swapnil Joshi: स्वप्नील जोशीला अपघातात गंभीर दुखापत? व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं खरं

Swapnil Joshi: स्वप्निल जोशीच्या अपघाताची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आता स्वतः अभिनेत्याने व्हिडीओच्या माध्यमातून त्याबद्दल खुलासा केला आहे.

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीला अपघातात गंभीर दुखापत? व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं खरं
Swapnil Joshi
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2026 | 11:12 AM

Swwapnil Joshi: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर पसरल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अभिनेत्याला गंभीर दुखापत झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. अनेक चाहत्यांनी, मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी त्याला फोन करून तब्येतीची विचारपूस केली. अखेर या सर्व चर्चांवर स्वप्नील जोशीने स्वतः मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत त्याने अपघाताची बातमी निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही, तर आपण पूर्णपणे ठणठणीत असल्याचं सांगत चाहत्यांना मोठा दिलासाही दिला आहे.

अपघाताच्या बातमीवर स्वप्नीलने दिलं स्पष्टीकरण

स्वप्नील जोशीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणतो, “नमस्कार, मी स्वप्नील जोशी. कालपासून माझ्या कानावर एक गोष्ट येत आहे. आता तिचा प्रचार आणि प्रसार वाढत आहे. कुठेतरी युट्यूबवर माझा अपघात झाला असून मला गंभीर दुखापत झाली आहे, अशी बातमी आली आहे.” पुढे तो म्हणाला की, या बातमीनंतर त्याचे चाहते, मित्रमंडळी आणि नातेवाईक सतत फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. अनेक जण काळजीपोटी मेसेज पाठवत आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Loading...

पहा व्हिडीओ

स्वप्नीलने व्हिडीओमध्ये पुढे सांगितले की, “मी ठणठणीत बरा आहे. मला काहीही झालेलं नाही. ही सगळी अफवा आहे. आता मी बोरिवलीमध्ये ‘लग्नपंचमी’ या नाटकाचा प्रयोग करतो आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेमामुळे मी एकदम ठीक आहे.” तसंच चाहत्यांनी या बातमीची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला, याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘मी बरा आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल मनापासून आभार’, असंही म्हटलं आहे.

स्वप्नील जोशी सध्या ‘लग्नपंचमी’ या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकात त्याच्यासोबत अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत. बोरिवलीमध्ये नाटकाचा प्रयोग करत असल्याचं सांगून त्याने आपण कामात सक्रिय असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांतून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘श्रीकृष्ण’ मालिकेतील कृष्णाची भूमिका असो किंवा ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ यांसारखे चित्रपट, त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us