Tanushree Dutta : माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकर यांनी राखी सावंतला दिले होते पैसे.. तनुश्री दत्ताचा मोठा आरोप
अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता नवे आरोप केले आहेत. तिने तिच्या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि नाना पाटेकर यांच्याबद्दल नवे दावे केलेत. काय म्हणाली ती ?

अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता अभिनेत्री राखी सावंत हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुरूवारी, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झालं, त्यानंतर तनुश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने नाना पाटेकर यांच्यासंदर्भात ‘ईव्हिल डेड’ असा शब्द वापरला होता. तिच्या या विधानानंतर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त करत तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. मात्र त्यानंतर तनुश्रीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तिने तिच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आणि राखी सावंत हिच्याबद्दल धक्कादायक दावे केले. तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे. नाना पाटेकर यांनी आपल्याविरोधात बोलण्यासाठी राखी सावंतला पैसे दिले होते, असा आरोप तिने केला आहे.
तनुश्रीने राखी सावंतवर काय केले आरोप ?
तनुश्री दत्ताने असा दावा केला की 2018 साली #MeToo आंदोलनादरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्याविरोधात बोलण्यासाठी राखी सावंतला पैसे दिले होते. तिच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी आणि वक्तव्य करण्यासाठी त्यांनी राखी सावंतला 2 ते 2.5 लाख रुपये दिले होते.तनुश्रीच्या दाव्यानुसार, पत्रकार परिषदेच्या दोन दिवस आधी राखीने नाना पाटेकर यांच्या मुंबईतील घरातून रोख रक्कम घेतली होती.
तनुश्री दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत म्हटले, “ राखी सावंत माझ्याबद्दल पत्रकार परिषदेत जे काही बोलली होते आणि माझ्यावर जे घाणेरडे आरोप केले होते, त्यासाठी तिला पैसे मिळाले होते. हे मी स्वतःहून सांगत नाहीये. राखी सावंतची पूर्वीची जवळची मैत्रीण राजश्री मोरे हिने मला याबद्दल सांगितलं होतं. राजश्रीच्या गाडीतून जाऊन राखीने नाना पाटेकर यांच्या घरातून दोन ते अडीच लाख रुपये घेतले होते. पत्रकार परिषद घेण्याच्या दोन दिवस आधी राजश्री मोरेने किमान पाच जणांसमोर ही गोष्ट सांगितली होती.” असा दावा तनुश्रीने केला.
राखीने नाना पाटेकर यांच्या घरातून पैसे घेतल्याचा आरोप
तनुश्री दत्ताने पुढे म्हटलं की, “ राखीला पैसे मिळाले होते, हे मलाही माहीत नव्हते. पण ती माझ्याबद्दल जे काही वाईट बोलली, त्या सगळ्यासाठी तिने पाटेकर यांच्यकडून पैसे घेतले होते. #MeToo चळवळीच्या काळात राखीने 15 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्यानंतर मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते. नाना पाटेकर यांचे लोक मला त्रास देत होते, असा दावा तिने केला. राजश्री मोरेला जाऊन विचारा, असंही ती पुढे म्हणाली.
काय आहे वाद ?
2018 मध्ये भारतात #MeToo चळवळ सुरू असताना तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केले आणि लैंगिक छळ केला, असा आरोप तनुश्रीने केला होता. मात्र, नाना पाटेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या चित्रपटात राखी सावंत देखील होती, तिने चित्रपटात एक आयटम साँग केलं होतं.
