Pranit More : ‘370 रुपयांची बिर्याणी’ वादात नाव ट्विस्ट, प्रणीत मोरेची सुप्रीम कोर्टात धाव, वकिलांची मोठी भूमिका
Pranit More : प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडीयन प्रणीत मोरे याचा '370 रुपयांची बिर्याणी'चा वाद अद्यापही शमलेला नाही. आता हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. यामध्ये प्रणीत यांच्या वकिलांनी मोठी भूमिका बजावली आहे.

Pranit More : प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडीयन प्रणीत मोरे याचा ‘370 रुपयांच्या बिर्याणी’चा वाद आता टोकाला पोहोचला आहे. या प्रकरणी अद्यापही कायदेशीर कारवाई सुरुच आहे. वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर प्रणीत याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. याप्रकरणी प्रणीत याच्या वकिलांनी मोठी भूमिका बजावली आहे.
प्रणीत मोरे याच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितलं की, विविध राज्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील आरोप आणि घटनेचा संदर्भ एकसारखाच आहे. याच कारणामुळे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटले चालवण्याऐवजी हे सर्व खटले एकाच ठिकाणी चालवले जावे..
तर यासर्व प्रकरणी प्रणीत याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे आणि तो न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे… असं देखील वकिलांनी पुढे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, FIR नोंद होण्याआधीच तो वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला होता. तो व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी प्रणीतच्या पीआर टीमने त्याची पूर्वपरवानगी घेतली नव्हती, असा दावाही कोर्टात करण्यात आला.
सांगायचं झालं तर, शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात एका तरूणाने सांगितलं की, ‘डेट’साठी तो एका तरूणीसोबत गेला आणि त्याने तिथे चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले. नंतर त्याला तो खर्च ‘वसूल’ करायचा होता. त्याचे हे बोलणं ऐकून शोमधील काही लोक हसताना दिसले, प्रणित मोरेही यावर हसला.
प्रकरण टोकाला पोहोचल्यानंतर, प्रणीत याने सोशल मीडियावर पोस्ट केलेली. प्रणितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “मी हे पूर्णपणे मान्य करतो की त्या लाईव्ह शो दरम्यान माझी प्रतिक्रिया ही माझी ‘लॅप्स इन जजमेंट’ (निर्णय घेण्यातील मोठी चूक) होती. मला त्यावेळी हसण्याऐवजी त्या प्रेक्षकाची टिप्पणी थांबवून त्याला विरोध करायला हवा होता. मी ही परिस्थिती वेगळ्या आणि योग्य प्रकारे हाताळू शकलो असतो.”
