
‘द 50’ या रिॲलिटी शोला त्याचा पहिला विजेता अखेर भेटला आहे. 22 मार्च रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. टीव्ही, सोशल मीडिया आणि मनोरंजन विश्वातील एकूण 50 स्पर्धकांसोबत हा शो सुरू झाला होता. ग्रँड फिनालेमध्ये मिस्टर फैजू, रजत दलाल, काका आणि कृष्णा श्रॉफ यांसारख्या तगड्या स्पर्धकांना मागे टाकत शिव ठाकरेनं विजेतेपद जिंकलं आहे. विशेष म्हणजे शिव ठाकरेला विजेतेपदाची जी रक्कम मिळाली, ती त्याने एका चाहत्याला दिली. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग असून त्याने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
विजयानंतर आनंद व्यक्त करताना शिव ठाकरे म्हणाला, “द 50 या शोचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि नवीन होता. मला जगाला शिव ठाकरेचा एक असा पैलू दाखवायचा होता, ज्याला भांडणतंट्यात विश्वास नाही. माझं असं मत आहे की तुम्ही न ओरडता, फक्त आपल्या मनाचं ऐकून खेळ जिंकू शकता. 50 दमदार स्पर्धकांमधून विजेतेपद जिंकणं हा माझ्यासाठी नेहमीच अविस्मरणीय अनुभव असेल. हा खेळ आपापसांतील ताळमेळ आणि गटबाजीचाही होता. माझ्यासोबत जे लोक होते, ते शेवटपर्यंत खंबीरपणे उभे राहिले.”
“एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन भारतातील सर्वांत मोठ्या रिॲलिटी शोचं विजेतेपद जिंकणं हे स्वप्नवतच आहे. खरं सांगायचं तर, माझं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच आहे. मी या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. हा विजय जितका माझा आहे, तितकाच माझ्या चाहत्यांचाही आहे. मला सर्वांत जास्त आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या एका चाहत्याला 50 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे”, अशा शब्दांत त्याने आनंद व्यक्त केला.
‘द 50’ या रिॲलिटी शोमध्ये टेलिव्हिजन, सोशल मीडिया, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील 50 स्पर्धक सहभागी झाले होते. या शोमध्ये करण पटेल, प्रिन्स नरुला, दिव्या अग्रवाल, रिधी डोग्रा आणि उर्वशी ढोलकिया यांसारख्या सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. तर फैजल शेख, लवेकेश कटारिया आणि रजत दलाल यांसारख्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबतच कृष्णा श्रॉफ, नेहल चुडासमा आणि शिव ठाकरे असे प्रसिद्ध चेहरेही त्यात होते.