दहावीतच ठरवलं अभिनेता व्हायचं, पुणे-मुंबई प्रवास केला; ‘शोले’तील एका भूमिकेने या कलाकाराला दिली नवी ओळख
या कलाकाराने दहावीतच अभिनेता होण्याचा निर्णय घेतला. पुण्याहून मुंबईला स्ट्रगल करत असताना, 'शोले' चित्रपटातील जेलरच्या भूमिकेने त्यांचं आयुष्य बदलले. त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या कारकिर्दीतील संघर्ष आणि यशाची ही गाथा आजही अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार झाले, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक नाव म्हणजे गोवर्धन कुमार असरानी, ज्यांना संपूर्ण जग असरानी नावाने ओळखतं. शानदार कॉमिक टायमिंग, चेहऱ्यावरचे अनोखे हाव-भाव आणि डायलॉग म्हणण्याची मजेदार सवय यामुळे त्यांनी लोकांना पोट धरून हसायला लावलं. त्यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या, पण ‘शोले’ चित्रपटातील – अंग्रेजों के जमाने के जेलर च्या रुपातील त्यांची ओळख आजही सर्वश्रुत आहे आणि तीही कधीच न विसरण्याजोगी. असरानी यांचं नाव घेतल्याचेव – तीच भूमिका डोळ्यांसमोर येते. गेल्या वर्षी, 20 ऑक्टोबर 2025 रोजी 84 वया वर्षी त्याचं निधन झालं, पण त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून ते आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत.
10 वीतच घेतला होता अभिनेता बनण्याचा निर्णय
अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या असरानी यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 1 जानेवारी 1941 रोजी राजस्थानमधील जयपूर येथे एका सिंधी-हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा गालिचे आणि साड्यांचा व्यवसाय होता. असरानी यांनी शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायात मदत करावी, अशी कुटुंबाची इच्छा होती. मात्र, त्यांचं मन अभिनय आणि संगीतामध्ये रमायचं. आठ भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या असरानी यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. शालेय जीवनात ते विविध नाटकांमध्ये सहभागी व्हायचे. याशिवाय, ऑल इंडिया रेडिओच्या जयपूर केंद्रावरील कार्यक्रमांमध्येही त्यांनी भाग घेतला. या अनुभवांमुळे अभिनयाची आवड अधिकच वाढली आणि त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
दहावीचे शिक्षण घेत असतानाच असरानी यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईतही आले. मात्र, सुरुवातीच्या काळात अपेक्षित संधी आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना पुन्हा जयपूरला परतावं लागलं. तरीही त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे प्रवेश घेतला. तिथे अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत त्यांनी आपल्या कलेला अधिक पैलू पाडले.
दर शुक्रवारी पुण्याहून मुंबईला जायचे
मात्र, अभिनयाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही असरानी यांचा संघर्ष संपला नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीत संधी मिळवण्यासाठी ते दर शुक्रवारी पुण्याहून मुंबईला जात असत. चित्रपट निर्मात्यांच्या भेटी घेणं, कामासाठी प्रयत्न करणं आणि नव्या संधीची वाट पाहणं, असा त्यांचा दिनक्रम होता. प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नव्हतं; पण त्यांनी प्रयत्न करणं कधीच थांबवलं नाही.
सुरूवातीला त्यांना छोट्या -छोट्या भूमिका मिळाल्या. पण त्यांनी प्रत्येक काम, प्रत्येक भूमिका अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणे साकारली. हळूहळू त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागला. ‘गुड्डी’, ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘अभिमान’ आणि ‘चुपके चुपके’ यांसारख्या चित्रपटातील अभिनयाद्वारे त्यांवी आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. विनोदी भूमिका असो किंवा एखाद्या गंभीर प्रसंगातील व्यक्तिरेखा, आपल्या सहजसुंदर अभिनयाने पात्र लक्षात राहील, अशी खासियत त्यांनी जपली. छोट्या भूमिकांनाही आपल्या अभिनयाच्या जोरावर संस्मरणीय बनवता येतं, हे त्यांनी सिद्ध केलं.
‘आज की ताजा खबर’ या चित्रपटातील विनोदी अभिनयासाठी असरानी यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘रफूचक्कर’, ‘बालिका वधू’ आणि ‘पति पत्नी और वो’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
शोलेने बदललं नशीब
असरांनी यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय चित्रपट ठरला ‘शोले’. 1975 साली आलेल्या या चित्रपटातील त्यांची जेलरची भूमिका प्रचंड गाजली. ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’, हा त्यांचा संवाद आजही अनेकांना तोंडपाठ आहे. या भूमिकेत ते स्वत:ला अतिशय हुशार, चलाख आणि शक्तिशाली समजणाऱ्या जेलरच्या भूमिकेत दिसले, पण त्यांच्या अशा वागण्याने लोकं हसून बेजार व्हायचे. या चित्रपटात त्यांची भूमिका छोटीशी असली तरी त्यांनी त्यातूनही अशी छाप पाडली की ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित, लोकप्रिय कॉमिक चित्रपटांपैकी एक ठरली.
