कधी सलमान खानसोबत झळकली, आज अभिनेत्रीचा जगण्यासाठी संघर्ष, चालवते टिफीन सर्व्हिस…कोण आहे ती ?
आज बॉंलिवूडच्या अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया जिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटात सलमान खानसोबत झळकलेली ही अभिनेत्री आज फिल्म इंडस्टीपासून दूर असून टिफीन सर्व्हिस चालवत्ये. कोण आहेत ती ?

दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक लोकं त्यांचं नशीब चमकवायला येतात. काहींच्या नशीबाचं कुलूप लगेच उघडतं, प्रसिद्धी , यश सगळं मिळत. पण काहींना चांगला डेब्यू करूनही पुढे चांगली संधि मिळत नाही. आज आपण बॉलिवूडच्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सलमान खान (Salman Khan) सोबत डेब्यू केलं. पण तरीही ती यशस्वी होऊ शकली नाही, पुढे फार संधि तिला मिळाली नाही. अखेर तिने लग्न करून इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता ती चक्क टिफीन सर्व्हिस चालवून गुजारण करत्ये. कोण आहे ती अभिनेत्री ?
सलमान खानसोबत पदार्पण, पण नंतर बदललं आयुष्य
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार मोठ्या अपेक्षांसह आपल्या करिअरची सुरुवात करतात. काहींना पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळते, तर काही कलाकारांना मात्र यश मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अभिनेत्री पूजा डडवाल यांची कहाणीही अशाच संघर्षाने भरलेली आहे. पूजा डडवाल हिने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी सलमान खानसोबत ‘वीरगती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मोठ्या कलाकारासोबत पदार्पण झाल्यामुळे तिच्या करिअरला चांगली सुरुवात मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तिच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही.
1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीरगती’ या चित्रपटाचं दिग्दर्शन के. के. सिंह यांनी केलं होतं. चित्रपटात सलमान खानसोबत पूजा डडवाल मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम पूजाच्या करिअरवरही झाला. तिला बॉलिवूडमध्ये मोठ्या भूमिका आणि चांगल्या चित्रपटांच्या संधी मिळाल्या नाहीत. त्यानंतर तिने छोट्या पडद्यावरही काम करण्याचा प्रयत्न केला. ‘आशिकी’ आणि ‘घराना’ यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली.
लग्नानंतर मुंबई सोडली
मात्र चित्रपटसृष्टीत अपेक्षित संधी मिळत नसल्याने पूजाने हळूहळू इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने लग्न केलं आणि मुंबई सोडून गोव्यात रहायला गेली. गोव्यात तिने आपल्या पतीसोबत व्यवसाय सुरू केला. दोघांनी मिळून कॅसिनो चालवण्यास सुरुवात केली. मात्र, आयुष्याचा हा टप्पाही तिच्यासाठी फारसा सुखाचा ठरला नाही.
अचानक गंभीर आजाराने आयुष्याला वेगळं वळण
2018 मध्ये पूजा डडवाल हिला टीबीसारख्या गंभीर आजाराची लागण झाली. तिचा प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. ती इतकी अशक्त झाली होती की उपचारांचा खर्च करणंही तिच्यासाठी मोठं आव्हानात्मक ठरलं. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, या कठीण काळात तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनीही त्यांची साथ सोडली. परिस्थिती बिकट झाल्यानंतर पूजा गोव्याहून मुंबईत परतली. मुंबईत तिच्या एका हितचिंतकाने तिला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असतानाही आर्थिक अडचणी कायम होत्या आणि तिच्या प्रकृतीबद्दल चिंता वाढत होती.
मदतीसाठी सोशल मीडियावर केलं आवाहन, सलमानने केली मदत
उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडस्ट्रीतील आपल्या ओळखीच्या लोकांकडे मदतीचं आवाहन केलं. पूजांची ही हाक सलमान खानपर्यंत पोहोचली. त्यानंतर सलमान खान हिने तिच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि तिच्या सहा महिन्यांच्या उपचारांची जबाबदारी घेतल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. भोजपुरी आणि बॉलिवूड अभिनेता रवि किशन यांनीही पूजाला मदत केल्याचं बोललं जातं.
एका मुलाखतीदरम्यान पूजाने सलमान खानबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, सलमान खानच्या मदतीमुळेच तिला आयुष्यात नवी संधी मिळाली.
आजारावर मात केली, पण संघर्ष थांबला नाही
दीर्घ उपचारानंतर पूजाने टीबीवर मात केली. मात्र, आजारातून बाहेर आल्यानंतर तिच्या आयुष्यातील अडचणी संपल्या नाहीत. बरं झाल्यावर तिच्याकडे नियमित उत्पन्नाचं साधन नव्हतं. एकेकाळी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या पूजावर मुंबईतील चाळीत राहण्याची वेळ आली. तिला अवघ्या 10 बाय 10 फुटांच्या खोलीत राहावं लागलं. अखेर उदरनिर्वाहासाठी तिने इतरांच्या घरात काम करण्यासही सुरुवात केली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिने बिलकूल हार मानली नाही.
सुरू केली टिफीन सर्व्हिस
2020 मध्ये पूजाने पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. ती ‘शुक्राना: गुरु नानक देव जी का नाम’ या पंजाबी चित्रपटात दिसली. मात्र, या कामामुळे तिच्या आर्थिक परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. त्यामुळे तिने पुन्हा चित्रपटसृष्टीतच काम करण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला.
दिग्दर्शक राजेंद्र सिंह यांच्या मदतीने पूजाने टिफिन सर्व्हिस सुरू केली. आज ती स्वतः जेवण तयार करून लोकांच्या घरापर्यंत पोहोचवतात. ती स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर आपला उदरनिर्वाह करत आहेत.