लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ही 7 नावं ! कधी, कुठे, कोणावर हल्ले ?
लॉरेन्स बिश्नोईचं टार्गेट आता फक्त सलमान खान पुरतं मर्यादित राहिलेलं नाही. टायगर श्रॉफ पासून ते रोहित शेट्टी, बाबा सिद्दीकी - हिटलिस्टमध्ये कोणा-कोणाचा समावेश ?

मायानगरी मुंबईत एखादा अभिनेता किंवा दिग्गज व्यक्तीवर हल्ला होतो, तेव्हा थेट 90च्या दशकातील भयावह काळाची आठवण होते. अंडरवर्ल्डच्या धमक्यांमुळे तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी दहशतीखाली होती. पण आजच्या काळात समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. पारंपरिक माफियांच्या जागी आता एका नव्या गुन्हेगारी सिंडिकेटने आपले जाळं विस्तारलं आहे. या टोळीचे कामकाज तुरुंगाच्या चार भिंतीआडूनही सुरू असल्याचं सांगितलं जातं. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर काल संध्याकाळी धडाधडा गोळीबार झाला, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेने पुन्हा एकदा हे अधोरेखित केलं की ही टोळी केवळ तोंडी धमक्या देण्यापुरती मर्यादित नसून, मायानगरीतील बड्या-बड्या व्यक्तींनाही लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे.
या गँगच्या रडारवर आत्तापर्यंत कोण-कोण आलं ? त्या 7 चेहऱ्यांवर आणि टाइमलाइनवर टाकूया नजर
1. सलमान खान (एप्रिल 2024)
या संपूर्ण यादीचा आणि वादाचा केंद्रबिंदू सुपरस्टार सलमान खान आहे. 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान दीर्घकाळापासून या गँगच्या निशाण्यावर आहे. दोन वर्षांपूर्वी, 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे वांद्रे येथील सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्याला उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
2. बाबा सिद्दीकी (ऑक्टोबर 2024)
या भयावह घटनाक्रमातील सर्वांत दुःखद आणि मोठी घटना 12 ऑक्टोबर 2024 रोजी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध नसला, तरी सलमान खानशी असलेली त्यांची जवळीक सर्वश्रुत होती. या हाय-प्रोफाइल हत्येची जबाबदारीही याच गँगशी संबंधित नेटवर्कने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबतही कठोर उपाययोजना करण्यात आल्या.
3. कपिल शर्मा ( 2025)
या गुन्हेगारी नेटवर्कचे जाळे केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित राहिले नाही, तर मनोरंजन क्षेत्रातील विनोदी कलाकारांनाही त्याची झळ बसली. 2025 मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता कपिल शर्माशी संबंधित ‘कॅप्स कॅफे’ला लक्ष्य करण्यात आलं. या कॅफेवर सलग गोळीबाराच्या घटना घडल्या. प्रसारमाध्यमांतील वृत्तांमध्ये या घटनांचा संबंध याच गुन्हेगारी नेटवर्कशी आणि सलमान खानशी असलेल्या संपर्कांशी जोडण्यात आला होता.
4. रोहित शेट्टी (फेब्रुवारी 2026)
या यादीत आता बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शकाचं नावंही ॲड झालं आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे पाच गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सोशल मीडियावर गँगशी संबंधित खात्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याच दावा करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत दहशतीच वातावरण होतं.
5. रणवीर सिंह (फेब्रुवारी 2026)
रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर लगेचच अभिनेता रणवीर सिंहच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. फेब्रुवारी 2026 मध्ये रणवीर सिंह यांच्या कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप व्हॉइस नोटद्वारे मोठ्या रकमेची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज आला होता. या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने पावले उचलली. रणवीरच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.
6. मुनव्वर फारूकी (ऑक्टोबर 2024 आणि नंतरही )
स्टँड-अप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस’चा विजेता मुनव्वर फारुकीचाही समावेश सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेच्या यादीत झाला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि प्रसारमाध्यमांतील वृत्तांच्या आधारे, ऑक्टोबर 2024 मध्ये मुनव्वरला संभाव्य धोके आणि धमक्यांचा सामना करावा लागल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली. तसेच, दिल्लीतही त्याला टार्गेट केलं जाऊ शकंत, या शक्यतेमुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं होतं
7. टायगर श्रॉफ (ऑक्टोबर 2026)
या घटनांच्या मालिकेतील सर्वांत ताजी घटना अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित आहे. काल म्हणजेच 18 ऑक्टोबर 2026स रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने, या घटनेत टायगर श्रॉफ बचावला; मात्र त्याचा चालक जखमी झाला. त्यानंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्स आणि दाव्यांमध्ये सलमान खान यांच्याशी जवळचे किंवा व्यावसायिक संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आपली नजर असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला.