अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नी म्हणते…

आमचं लग्न मोडलेलं नव्हतं. त्याचा खर्चही मीच भागवत होते, असा दावा अभिनेता कुशल पंजाबीची पत्नी ऑड्रीने केला आहे. कुशलने दहाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती

अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येनंतर पत्नी म्हणते...

मुंबई : टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याच्या आत्महत्येने खळबळ उडाल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी त्याच्या पत्नीने भावना व्यक्त केल्या आहेत. कुशलच्या आत्महत्येसाठी त्याची पत्नी ऑड्री डॉलेन हिला जबाबदार ठरवणाऱ्यांचं तोंड तिने बंद केलं. आमच्यात मतभेद होते, मात्र आमचं लग्न मोडलेलं नव्हतं. त्याचा खर्चही मीच भागवत होते, असा दावा ऑड्रीने (Kushal Punjabi wife speaks out) केला आहे.

कुशल पंजाबीने 26 डिसेंबर 2019 रोजी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी कुशलने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कुशलची पत्नी ऑड्री त्याला सोडून विभक्त झाल्यामुळेच तो वैफल्यग्रस्त झाल्याचा दावा काही जणांनी केला होता.

‘आम्हा दोघांमध्ये काही गोष्टींवर बेबनाव होते. पण आमचं वैवाहिक आयुष्य संपुष्टात आलेलं नव्हतं. मी कधीच माझ्या मुलाला कुशलशी बोलण्यापासून रोखलं नाही. कुशल त्याच्या कुटुंबाबाबतीत गंभीर नव्हता. मी त्याला शांघायमध्ये सेटल होण्यासाठी बोलावलं होतं, पण त्याने नकार दिला’ असा दावा ऑड्रीने केला आहे.

‘इतकंच नाही, तर कुशलचा खर्चही मीच करायचे. कुशल एक बेजबाबदार पिता होता. माझ्या मुलालाही त्याच्या वडिलांबद्दल काही वाटेनासं झालेलं. कुशलला आपल्या मुलाची काळजी नव्हती. कुशलने आत्महत्या केली तेव्हा मी मुलासोबत ख्रिसमस हॉलिडेनिमित्त फ्रान्समध्ये होते. त्याच्या आत्महत्येसाठी मला का जबाबदार धरलं जातंय, तेच मला कळत नाही.’ असं ऑड्री पुढे म्हणते.

वांद्र्यातील पाली हिल परिसरात असलेल्या घरात कुशलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याला भाभा रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी कुशलला मृत घोषित केलं होतं. पोलिसांना मृतदेहासोबत सुसाईड नोटही सापडली होती.

“मला चित्रपटसृष्टीत ऑफर मिळत नाहीत, माझे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. या कारणामुळे मी आत्महत्या करत आहे, माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरु नये” असं कुशलने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. कुशल गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होता.

माझ्या प्रापर्टीचा अर्धा हिस्सा माझे भाऊ, बहीण, आई, वडील यांना देण्यात यावा. तर अर्धा हिस्सा हा माझ्या बायको आणि मुलाला देण्यात यावा असंही कुशलने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

‘इश्क में मरजावां’ या मालिकेत चाहत्यांना कुशलचं अखेरचं दर्शन झालं होतं. कुशलची पत्नी ऑड्री युरोपियन आहे. त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे.

कुशलने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तो अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसला होता. अंदाज, लक्ष्य, काल, धन धना धन गोल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

सीआयडी, देखो मगर प्यार से, कसम से, राजा की आयेगी बारात, अदालत अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये कुशलने काम केलं आहे. फिअर फॅक्टर इंडिया, मिस्टर & मिस टीव्ही, पैसा भारी पडेगा, नौटिका नेव्हीगेटर्स चॅलेंज, एक से बढकर एक, जोरका झटका आणि झलक दिखला जा यासारख्या अनेक रिअॅलिटी शोंमध्ये तो दिसला होता.

Kushal Punjabi wife speaks out