अमृतसरमधून पिस्तूल, महिलांच्या बॅगेतून मुंबईत एन्ट्री अन् गोळीबारानंतर पलायन; टायगर श्रॉफ प्रकरणात गँगस्टरचा कट उघड!
Tiger Shroff firing case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. दोन महिलांना रेल्वे स्थानकावरून अटक केले आहे. तर दोन तरुणांना हरियाणातून ताब्यात घेतलं आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे की, हल्लेखोरांचे सुरुवातीचे लक्ष्य टायगर श्रॉफ नसून, एक दुसरा प्रसिद्ध सेलिब्रिटी होता. यानंतर आता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. टायगर श्रॉफच्या कारवरील १८ ऑक्टोबरच्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल (वय २१), सुमित (वय १९), राधा (वय २३) आणि बाबिता (वय २३) अशी आरोपींची नावे आहेत. कुणाल आणि सुमित हे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील रहिवासी, तर राधा आणि बाबिता उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यानंतर मुंबई सीआयडीने न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना औपचारिक अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपींच्या तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली.
गँगस्टर अनिल पंडितच्या सांगण्यावरून कुणालने अमृतसरमधून एक पिस्तूल आणि २० काडतुसे मिळवली. यावेळी सुमित त्याच्यासोबत होता. जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या कुणालची हरसाना गावातील एका मित्रामार्फत अनिल पंडितशी ओळख झाली होती. दोघेही एन्क्रिप्टेड ॲपवरून संपर्कात होते. कुणालने राधाशी जवळीक वाढवून तिला शस्त्र घेऊन मुंबईला जाण्यास तयार केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. १५ ऑक्टोबरला कुणालने राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सोडले.
पिस्तूल राधाच्या बॅगेत ठेवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपवरून संपर्कात होता आणि अनिल पंडितच्या सूचना महिलांपर्यंत पोहोचवत होता. १७ ऑक्टोबरला दोन्ही महिला दादर येथे उतरल्या आणि एका हॉटेलमध्ये थांबल्या. सकाळी सुमारे ११ वाजता एका अल्पवयीन मुलाने राधाकडून शस्त्राची बॅग घेतल्याचा तपासात उल्लेख आहे. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला.
त्यानंतर शूटर मुंबईत अडकल्याचे सांगून अनिल पंडितने कुणालला त्यांच्या पळून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. गोळीबारानंतर १८ ऑक्टोबरलाच राधा आणि बाबिता दादर-हरिद्वार एक्स्प्रेसने दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. २० ऑक्टोबरला दोन्ही महिलांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून, तर कुणाल आणि सुमितला हरियाणातील सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
तर दुसरीकडे टायगर श्रॉफच्या अगदी जवळून गोळी झाडताना बंदूक जाम झाल्याच्या एक व्हीडिओ समोर आला आहे. एका चाहत्याने काढलेल्या व्हीडिओत अगदी जवळची दृश्य कैद झाली आहेत. आरोपी राउंड झाडत होते. मात्र शेवटची ती गोळी झाडली गेली असती तर अनर्थ झाला असता. आरोपीने बंदूक खिडकीवर जवळून ताणली पण ती जाम झाल्याने गोळीच झाडली गेली नाही. पुन्हा आरोपीने बंदूक रिलोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहकारी निघत असल्याने त्याला तसेच जावे लागले. पहिला राउंड फायर होताच टायगरने प्रसंगावधान दाखवत तो सीटवरच खाली वाकून राहिला. त्यामुळे त्याला एकही गोळी लागली नाही.
