Upasana Singh : सेटवर लाईटमॅनचा मृत्यू, निर्मात्यांकडून दुर्लक्ष; प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू; म्हणाली, मृतदेह बाजूला ठेऊन…
Upasana Singh : अभिनेत्री उपासना सिंहनं नुकत्याच एका मुलाखतीत सेटवरचा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री उपासना सिंह यांनी मनोरंजनविश्वातील काही धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कलाकारांसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या तंत्रज्ञांचीही मोठी मेहनत असते. मात्र, अनेकदा त्यांच्या सुरक्षिततेकडे आणि अडचणींकडे दुर्लक्ष केलं जातं. याच मुद्द्यावर भाष्य करत उपासनानं सेटवर घडलेली एक अंगावर शहारे आणणारी घटना सांगितली. एका लाइटमनचा उंचावरून पडून मृत्यू झाला होता, तरीही निर्मात्यांनी त्याचा मृतदेह बाजूला ठेवून शूटिंग सुरू ठेवलं होतं, असं तिनं सांगितलं.
उपासना सिंहनं अलीकडेच अंकर सिंह यांच्याशी संवाद साधताना मनोरंजनसृष्टीतील अनेक कटू अनुभव सांगितले. यावेळी तिनं एका कॉमेडी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत असतानाचा प्रसंगही सांगितला. या शोमध्ये एक स्पर्धक परफॉर्मन्स करत असताना अचानक बेशुद्ध पडला होता. मुंबईत आलेल्या अनेक स्पर्धकांकडे राहण्याची आणि जेवणाची पुरेशी व्यवस्था नसते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना अनेकदा उपाशी राहावं लागतं. अशाच परिस्थितीत संबंधित स्पर्धक बेशुद्ध पडल्याचं उपासना यांनी सांगितलं.
मात्र, या घटनेनंतर निर्मात्यांनी घेतलेली भूमिका पाहून तिला धक्का बसला. स्पर्धकाला तातडीनं वैद्यकीय मदत देण्याऐवजी त्याची अवस्था कॅमेऱ्यात टिपण्याची तयारी सुरू होती. तो उपाशी असल्यामुळे बेशुद्ध पडला का, असा प्रश्न त्याला कॅमेऱ्यासमोर विचारण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. त्याला खाण्यासाठी काही देणं किंवा डॉक्टरांना बोलावणं यापेक्षा टीआरपीसाठी हा प्रसंग शूट करण्याला प्राधान्य दिलं जात असल्याचं पाहून उपासनाला वाईट वाटलं.
लाइटमॅनच्या मृत्यूनंतरही सुरू होतं शूटिंग
उपासनानं आणखी एका गंभीर घटनेची आठवण सांगितली. चित्रपटाच्या सेटवर लाइटमन उंचावरून पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सेटवर लाईटची व्यवस्था करण्यासाठी लाइटमन आणि इतर तंत्रज्ञांना उंच प्लॅटफॉर्मवर काम करावं लागतं. उन्हाचा तडाखा आणि कामाचा ताण यामुळे त्यांच्या कामात अनेक धोके असतात. अशाच एका घटनेत लाइटमनचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृतदेह एका बाजूला ठेवून निर्मात्यांनी शूटिंग सुरूच ठेवलं, असं उपासनानं सांगितलं.
निर्माते चित्रपट किंवा मालिकेसाठी मोठी गुंतवणूक करतात, चित्रीकरण थांबल्यास आर्थिक नुकसान होतं, हे मान्य आहे. मात्र, आर्थिक नुकसानीपेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा नाही का? असा सवाल अभिनेत्रीनं उपस्थित केला. एखाद्या कलाकाराचं अचानक निधन झालं, तरी दुसऱ्याच दिवशी त्याच्या जागी दुसऱ्या कलाकाराला घेतलं जातं. शो सुरू राहायला हवा आणि ठरलेल्या वेळेत भाग प्रसारित व्हायला हवेत, या कारणांमुळे अनेकदा माणुसकीला दुय्यम स्थान दिलं जातं, अशी खंतही अभिनेत्रीनं व्यक्त केली.