The Deverakonda Foundation: विजय देवरकोंडा – रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप
अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी होतकरू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वितरित करून सर्वांची मनं जिंकली आहेत. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी लग्नानंतर हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. लग्नानंतर या नवदाम्पत्याने आधी विविध शहरांमध्ये गरीबांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केली आहे. यासाठी विजय आणि रश्मिका यांनी रविवारी तेलंगणामधल्या अचमपेट मंडळातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. ‘द देवरकोंडा फाऊंडेशन’च्या माध्यमातून 180 गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती वितरित केली. सरकारी शाळांमधील नववी आणि दहावीच्या होतकरू विद्यार्थ्यांना यातून मदत मिळावी आणि त्यांच्या शिक्षणातील आर्थिक भार कमी व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
वडिलांच्या गावाची निवड
विजय आणि रश्मिका यांनी या परोपकारी कार्यासाठी थुम्मनपेट गावाची सर्वांत आधी निवड करण्यामागे एक विशेष कारण होतं. कारण थुम्मनपेट हे त्यांचं वडिलोपार्जित गाव आहे. याच गावात विजयच्या वडिलांचा जन्म झाला होता आणि ते तिथेच लहानाचे मोठे झाले होते. विजय आणि रश्मिकाने फेब्रुवारीमध्ये लग्नानंतर सर्वांत आधी याच गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्याने या कार्याची संकल्पना मांडली होती.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
याविषयी विजयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची नावं जाहीर केली होती. ‘आम्ही थुम्मनपेटच्या दिशेने निघालो आहोत. या छोट्याशा गावात माझ्या वडिलांचा जन्म झाला होता. फेब्रुवारीमध्ये रश्मिका आणि मी मिळून आमचं एक छोटं स्वप्न जाहीर केलं होतं. त्याच स्वप्नाच्या दिशेने आज पहिलं पाऊल टाकतोय. तेलंगणातील अचमपेट मंडळातील नववी आणि दहावीच्या होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असून मी इथे त्या 180 विद्यार्थ्यांची यादी पोस्ट करत आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना अभिमान वाटेल असं काम केलं आहे’, असं त्याने लिहिलं होतं.
विद्यार्थ्यांची यादी
रश्मिका-विजयचं स्वप्न
या कार्यक्रमादरम्यान जमलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना विजयने हा शैक्षणिक प्रकल्प अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली. “ही शिष्यवृत्ती म्हणजे खूपच छोटी भेट आहे. पण तरी मला असं वाटतं की हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मला तुमच्या आयुष्याचा एक भाग व्हायचं आहे. माझ्या गावानंतर हळूहळू संपूर्ण तेलंगणामध्ये ही मोहीम सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे. हे माझं स्वप्न आहे”, असं तो म्हणाला. तर यावेळी रश्मिकानेही मंचावर येऊन मुलांचं अभिनंदन केलं.
काय म्हणाली रश्मिका?
“आज आम्ही द देवरकोंडा फाऊंडेशनच्या माध्यमातून एका चांगल्या गोष्टीची सुरुवात करत आहोत. याची सुरुवात माझ्या सासऱ्यांचं गाव अचमपेट आणि थुम्मनपेट इथून करू, असं आम्ही ठरवलं. आज मी तुमच्यासमोर रश्मिका मंदाना देवरकोंडा म्हणून उभी आहे. हे कार्य करताना मला खूप आनंद होत आहे”, अशा शब्दांत रश्मिका व्यक्त झाली.
विजयची पोस्ट-
या उपक्रमानंतर विजयने त्याच्या आईवडिलांसोबतचा सुंदर फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘आणखी एक सुंदर दिवस. 45 शाळांमदील 180 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या पहिल्या वर्षाची नुकतीच सांगता झाली. 2027 च्या जूनमध्ये तुम्हा सर्वांना पुन्हा भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. हा उपक्रम आणखी मोठं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हा सर्वांकडून खूप खूप प्रेम, तुमचाच विजय’