Vivek Oberoi: विवेक ओबेरॉयच्या लेकीची कॅन्सरवर मात, आता फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण; भावूक झाला अभिनेता

विवेक ओबेरॉयने यावेळी कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्याचं आवाहनही केलं. आर्थिक मदत शक्य नसेल तर रुग्णांसोबत वेळ घालवणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि प्रेम देणंही महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितलं.

Vivek Oberoi: विवेक ओबेरॉयच्या लेकीची कॅन्सरवर मात, आता फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण; भावूक झाला अभिनेता
विवेक ओबेरॉय आणि त्याने दत्तक घेतलेली मुलगी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2026 | 1:27 PM

अभिनेता विवेक ओबेरॉयची लेक सहरा शाह सध्या चर्चेत आली आहे. लहानपणी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या सहराने आता त्यावर मात केली असून ती तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सहरा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तिच्या या निर्णयामुळे विवेक ओबेरॉय भावूक झाला. सहरा शाह सध्या 22 वर्षांची आहे. लहान वयातच ती कॅन्सरच्या उपचारातून गेली होती. विवेक ओबेरॉयने सहराला साधारण अडीच वर्षांची असताना दत्तक घेतलं होतं. कॅन्सरच्या उपचारादरम्यान तिची आणि विवेकची भेट झाली होती. या काळात विवेकने तिच्या उपचारांना आणि पुढील प्रवासाला साथ दिली. आज सहरा कॅन्सरमुक्त असून तिचं आयुष्य नव्या दिशेने पुढे जात आहे.

मुंबईत झालेल्या ‘कॅन्सर पेशन्ट्स एड असोसिएशन’च्या (CPAA) ‘कॅन्सर रोज डे’ कार्यक्रमात सहराने तिच्या अभिनयातील पदार्पणाची घोषणा केली. विशेष म्हणजे, तिने हा निर्णय सर्वांसमोर जाहीर करण्यापूर्वी विवेक ओबेरॉयचा आशीर्वादसुद्धा घेतला. सहरा आगामी नेपाळी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘26 करोड’ असल्याचं कळतंय. सहराने सांगितलं की, लहानपणापासूनच ती विवेकला पाहत आली आहे. त्याच्या कामातून प्रेरणा घेत तिलाही अभिनय क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती. विवेकने तिच्या अभिनय, डान्स आणि इतर स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचंही तिने सांगितलं.

लेकीची गोष्ट सांगताना विवेक भावूक

सहराच्या कॅन्सरच्या दिवसांची आठवण सांगताना विवेक ओबेरॉय यावेळी भावूक झाला. अडीच वर्षांच्या चिमुकल्या सहराला केमोथेरपी घेताना पाहिल्याचं त्याने सांगितलं. तिचा चेहरा फिकट पडला होता, डोळे लाल होते; मात्र तिच्यातील लढण्याची जिद्द त्यांनी तेव्हाच ओळखली होती. सहराने त्याचा हात पकडला होता आणि ती ही लढाई नक्की जिंकेल, असा विश्वास त्यांना वाटला होता, असं विवेकने सांगितलं. आज ती कॅन्सरमुक्त होऊन आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाहून विवेकने अभिमान व्यक्त केला. लेकीने पहिल्या चित्रपटावर स्वाक्षरी केल्याचा क्षण त्याच्यासाठी अत्यंत भावूक करणारा ठरला.

अभिनयासोबत वैमानिक होण्याचीही तयारी

विशेष म्हणजे अभिनय हा सहराचा एकमेव करिअर पर्याय नाही. तिने एव्हिएशनचं प्रशिक्षण पूर्ण केलं असून कमर्शियल पायलट होण्याचीही तिची इच्छा आहे. त्यामुळे आता तिच्यासमोर आकाशात झेप घेण्यासोबतच रुपेरी पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us