विवेक ऑबेरायबद्दल भावाने वापरले जिव्हारी लागणारे शब्द; ‘त्याच्याशी माझं…’
अभिनेता विवेक ओबेरॉयशी कौटुंबिक वाद असल्याचा खुलासा त्याच्या चुलत भावाने केला आहे. अभिनेता अक्षय ओबेरॉय हा विवेकचा चुलत भाऊ आहे. परंतु या दोघांना कधीच एकत्र पाहिलं गेलं नाही. यामागचं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉयने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याची फीमेल फॅन फॉलोईंग खूप होती. फक्त विवेकच नाही तर त्याचा भाऊ अक्षयसुद्धा अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. अक्षय आणि विवेक चुलत भावंडं आहेत. असं असूनही या दोघांना कधीच एकत्र पाहिलं गेलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकसोबतच्या नात्याबद्दल अक्षय मोकळेपणे व्यक्त झाला. विवेकने चित्रपटसृष्टीत आपला जम बसवला होता. परंतु तरीही अभिनयविश्वात पाऊल ठेवताना अक्षयला भावाच्या नावामुळे कोणतीच ऑफर मिळाली नव्हती.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय ओबेरॉयला प्रश्न विचारण्यात आला की, चुलत भाऊ विवेकच्या बॉलिवूडमधील पडत्या काळाचा फटका तुला कधी बसला का? त्याच्यामुळे तुला संधी गमवाव्या लागल्या का, असं विचारला असता अक्षय म्हणाला, “मला कधीच कोणी तोंडावर असं म्हटलेलं नाही. मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगू शकतो की मला असं वाटतं की हे कोणालाच माहीत नसेल की आमचे कौटुंबिक संबंध आहेत. कास्टिंग करणाऱ्यांनाही ही गोष्ट माहीत नसेल. कोणालाच माहीत नव्हतं आणि या गोष्टीचा मी कधीच फायदा घेतला नाही. अशीही बाब नव्हती की मी त्याला (विवेकला) फोन करून सांगू शकेन. दुर्दैवाने मी ही गोष्ट अभिमानाने नाही तर दु:खाने सांगतोय की आमच्यात खरं नातंच नव्हतं. त्यामुळे मी त्याला फोन करून तरी काय विचारणार? मी फक्त माझ्या मार्गावर चालत राहिलो.”
View this post on Instagram
“माझी कोणीच मदत करणार नाही, याची मला खात्री होती. या क्षेत्रात माझा कोणी मार्गदर्शक, गॉडफादर किंवा मेंटॉर नव्हता. आता जेव्हा मी थोडंफार यश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, लोक अंदाज लावत आहेत. मला पत्रकार प्रश्न विचारतात, ज्या दिग्दर्शकांसोबत मी काम केलं, ते म्हणतात की अरे तू मला कधी सांगितलं नाहीस. पण तुम्हाला सांगू तरी काय, असा मी विचार करायचो. कारण शेअर करण्यासाठी काही असायला तरी हवं, हो की नाही? आमच्या कुटुंबीयांमध्ये कधीच एकमेकांचं जमलं नाही. कदाचित एक कुटुंबीय म्हणून आम्ही दुर्दैवी असू. तो (विवेक) आणि त्याचे वडील खूप चांगले अभिनेते आहेत आणि मला त्या कुटुंबाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. जर आम्ही कधी एकत्र काम करू शकलो असतो, तर मजा आली असती”, अशा शब्दांत अक्षयने भावना व्यक्त केल्या.
अक्षयचा आगामी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि मनिष पॉल सहाय्यक भूमिकेत आहेत.
