मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा पुन्हा चिंतेचा विषय बनली असून, धूळ आणि धुक्याच्या मिश्रणामुळे तयार झालेल्या धुरक्यामुळे मुंबईकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. या वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांवर परिणाम होत आहे. मुंबई महानगरपालिकेने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
मुंबईतील हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली असून, धूळ आणि धुक्याच्या मिश्रणामुळे तयार झालेल्या धुरक्याने शहरातील वातावरण ढगाळ बनले आहे. नरिमन पॉईंट परिसरात पहाटेची परिस्थिती पाहता, धुक्यामुळे लांबच्या इमारती किंवा समुद्रापलीकडचे दृश्य स्पष्ट दिसत नाहीये. हवेची गुणवत्ता खराब झाल्याने नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे.
या वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम मुंबईतील आणि आसपासच्या शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खोकला आणि सर्दीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार अधिक त्रासदायक ठरत आहेत. मुंबई महानगरपालिका प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करत असली, तरी धूळ आणि धुराच्या मिश्रणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईकरांकडून आता कठोर उपाययोजनांची मागणी केली जात आहे.

