सातारा एमडी ड्रग्स फॅक्टरी पर्दाफाश; ११५ कोटींचा मुद्देमाल जप्त, राजकीय वर्तुळात खळबळ
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्स फॅक्टरीचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करून ११५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनी सरकारला सवाल केले आहेत.
साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावामध्ये मुंबई क्राईम ब्रांचने एका एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी सुमारे 115 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई एका शेडमध्ये ड्रग्स तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आली. छाप्यादरम्यान 3 कारागिरांसह एका स्थानिक व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शेडमालक गोविंद शिंदकर यांनी हे शेड रस्त्याच्या कामांवरील कामगारांसाठी मोफत दिल्याचे सांगितले, ड्रग्स निर्मितीची कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, साताऱ्यातील पर्वतरांगांमध्ये ड्रग्सचा कारखाना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

