यामी गौतम-आदित्य धर कायमचे मुंबई सोडणार? हिमाचलमध्ये शिफ्ट होण्याच्या चर्चांवर टीमने सांगितलं सत्य
आदित्य धर आणि यामी गौतम हे मुंबई सोडून कायमचे हिमाचल प्रदेश याठिकाणी स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. यावर आता आदित्यच्या टीमकडून उत्तर देण्यात आलं आहे.

Yami Gautam- Aditya Dhar: अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक अदित्य धर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून एक बातमी चर्चेत होती. मुंबई सोडून हे जोडपं हिमाचल प्रदेशमध्ये कायमचं स्थायिक होणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र आता अदित्य धर यांच्या टीमने या वृत्तांवर स्पष्ट स्पष्टीकरण दिलं आहे. यामी गौतमचा हिमाचल प्रदेशशी असलेला संबंध सर्वश्रुत आहे. अभिनेत्रीचा जन्म हिमाचलमध्ये झाला असून तिच्या कुटुंबाचंही या राज्याशी जवळचं नातं आहे. त्यामुळे यामी आणि अदित्य मुंबई सोडून हिमाचलमध्ये स्थायिक होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली.
काही रिपोर्ट्समध्ये तर दोघांनी मुंबईतील घर सोडून हिमाचल प्रदेशला आपलं कायमस्वरूपी ठिकाण बनवल्याचा दावा करण्यात आला होता. कामानिमित्त मुंबईला ये-जा सुरू राहणार असल्याचंही या वृत्तांमध्ये म्हटलं होतं. यामी गौतमच्या हिमाचलमधील घरामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, गोहर, मंडी इथं यामीकडे सुमारे 25 एकर परिसरात असलेलं जवळपास 100 वर्ष जुनं हेरिटेज घर आहे. लाकूड आणि दगडांनी बनलेल्या या घराभोवती हिरवळ आणि शेतीचा परिसर आहे. इथं सफरचंद, बटाटे, प्लम आणि आलं यांसारख्या पिकांची लागवड केली जाते. विशेष म्हणजे यामी आणि अदित्य यांनी जून 2021 मध्ये याच हिमाचली प्रॉपर्टीवर लग्न केलं होतं. त्यामुळे हे घर त्यांच्या दोघांसाठीही भावनिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे.
अदित्य धरच्या टीमने दिलं स्पष्टीकरण
मात्र आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. अदित्य धरच्या टीमने यामी आणि अदित्य हिमाचलमध्ये कायमचे स्थलांतरित होत असल्याच्या बातम्या स्पष्टपणे फेटाळल्या आहेत. ‘स्क्रीन’शी बोलताना टीमने या दाव्यांना नकार दिला आणि अशा बातम्या कोणाकडून पसरवल्या जात आहेत, असा उलट सवालही केला. त्यामुळे सध्या तरी मुंबई सोडून हिमाचलमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा दोघांचा निर्णय झालेला नाही.
दरम्यान, यामी आणि अदित्य सध्या त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीमुळेही चर्चेत आहेत. ‘आर्टिकल 370’साठी यामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर अदित्य धरला या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अदित्यच्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीलाही मोठं यश मिळालं आहे. यामी आता ‘नयी नवेली’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असून हा सिनेमा 16 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.