Yami Gautam: ‘नई नवेली’च्या सेटवर यामी-आदिनाथचं असं होतं बाँडिंग ; सांगितला मराठमोळ्या स्टारसोबत काम करण्याचा खास अनुभव
यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे अभिनित 'नई नवेली' हा हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक ड्रामा असलेला चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. यामी आणि आदिनाथने सेटवरील त्यांच्या उत्कृष्ट बॉन्डिंगबद्दल सांगितले. आनंद एल. राय निर्मित आणि बालाजी मोहन दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना एक मनोरंजक अनुभव देणार आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी यामी गौतम (yami Gautam) सध्या बरीच चर्चेत आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला ‘नई नवेली’ हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा देखील झळकणार असून त्यामुळे हा चित्रपट पाहण्यास चाहते बरेच उत्सुक आहेत. हॉरर, कॉमेडी आणि कौटुंबिक ड्रामाचा अनोखा मिलाफ असलेल्या ‘नई नवेली’ या चित्रपटात अभिनेता आदिनाथ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, आदिनाथ आणि यामी गौतम ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून आदिनाथचा रुबाबदार आणि हटके अंदाज लक्ष वेधून घेताना दिसला. ट्रेलर समोर आल्यापासून असून सगळीकडे ‘नई नवेली’ चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनीही या ट्रेलरचं बरंच कौतुक केलं आहे.
‘नई नवेली’ या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध निर्माते आनंद एल. राय यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. बालाजी मोहन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, हिमांशु शर्मा आणि दिव्य निधी शर्मा यांनी कथा लिहिली आहे. हॉरर, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा सुरेख मेळ साधणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे. या महिन्यात म्हणजे, 16 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार असून प्रेक्षकांना तो पाहता येईल.
काय म्हणाली यामी ?
नुकताच ‘नई नवेली’ या सिनेमाचा खास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला यामी गौतम आणि आदिनाथ कोठारे यांनी एकत्र हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान, चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान यामीला सेटवर आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, तसेच दोघांचं सेटवरील समीकरण कसं होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर यामीने त्यांच्या बॉन्डिंगबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं.
ती म्हणाली, “ आमच्यात आता जसं बॉन्डिंग दिसत आहे, अगदी तसंच समीकरण आमचं सेटवरही होतं.” यामीच्या या वक्तव्याला आदिनाथनेही लगेच होकार देत दुजोरा दिला. पुढे यामीने आदिनाथसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. “ मला याच्यासोबत काम करताना खूप मजा आली,” असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यातून दोघांमध्ये शूटिंगदरम्यान असलेला सहजपणा आणि मैत्रीपूर्ण नातं स्पष्टपणे जाणवलं.
दरम्यान, आदिनाथ कोठारे सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसत आहे. मराठी मनोरंजनविश्वातून हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आदिनाथसाठी ‘नई नवेली’ हा सिनेमा महत्त्वाचा ठरणार आहे. या सिनेमातून त्याची यामी गौतमसोबतची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ‘नई नवेली’नंतर आदिनाथ आणखी एका बहुप्रतीक्षित प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर तो ‘रामायण’ या बहुचर्चित सिनेमातही झळकणार आहे. त्यामुळे आगामी काळात आदिनाथ बॉलिवूमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे.