सिनेमा पाहताना चिप्स आणि कोल्डड्रिंक पिण्याची आहे सवय? तर जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
अनेकदा आपण घरी सिनेमा पाहत असताना चिप्स आणि कोल्डड्रिंक पितो पण ती सवय चांगली आहे की, वाईट याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तर जाणून घ्या काही महत्त्वाच्या टीप्स

चिप्स आणि कोल्डड्रिंक लहान मुलांपासून मोठ्यांना देखील आवडतं पण ते आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. अनेक जण सिनेमा पाहताना देखील चिप्स आणि कोल्डड्रिंक पितात. फक्त सिनेमाच नाही तर, पार्ट्यांमध्ये किंवा मित्रांसोबत वेळ घालवताना चिप्स खाण्याची आणि कोल्डड्रिंक पिण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. मात्र, हे नियमितपणे सुरू ठेवल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः पॅकेट चिप्समधील जास्त मीठ आणि चरबीचे प्रमाण तसेच शीतपेयांमधील साखरेचं प्रमाण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करू शकतं. त्यामुळे, या गोष्टींचं सेवन प्रमाणात करणंच उत्तम आहे.. असं सांगितलं जातं.
चिप्सच्या पाकिटांमध्ये सहसा मीठ आणि चरबीचं प्रमाण जास्त असतं. याउलट, नेहमीच्या गोड कोल्डड्रिंकमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असतं. या दोन्ही गोष्टींचं नियमितपणे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकतं. चिप्समधील सोडिअमच्या उच्च प्रमाणामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्याचप्रमाणे, नियमितपणे गोड पेये प्यायल्याने रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. तथापि, चिप्स आणि शीतपेयांच्या सेवनाने लगेचच गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात, असे सांगण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
जास्त प्रमाणात तळलेले चिप्स खाल्ल्याने काही लोकांना अपचन, पोट फुगणे आणि अस्वस्थता जाणवू शकतं. कार्बनयुक्तकोल्डड्रिंक प्यायल्याने पोटात गॅस आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. या समस्या प्रत्येकामध्ये सारख्याच प्रकारे उद्भवत नाहीत. खाल्लेल्या पदार्थांचे प्रमाण, वैयक्तिक आरोग्य स्थिती आणि रोजच्या आहारावर अवलंबून याचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.
सर्वात धोकादायक म्हणजे, जास्त मीठ असलेल्या पदार्थांच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, गोड पेयांच्या अतिसेवनाने वजन वाढण्याचा आणि टाईप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. अशा आहार पद्धतींचा दीर्घकाळात हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
अशात आरोग्याचा विचार केल्यास चिप्स आणि कोल्डड्रिंक ऐवजी, तुम्ही भाजलेले चणे, मोड आलेले धान्य, कमी मिठाचे पदार्थ आणि माफक प्रमाणात सुका मेवा निवडू शकता. पेयांसाठी, तुम्ही पाणी, ताक किंवा साखर नसलेले लिंबू पाणी पिऊ शकता. एकंदरीत, चिप्स आणि साखरयुक्त पेयांची रोजची सवय करण्याऐवजी, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला प्राधान्य देऊन आरोग्य राखणे फायदेशीर ठरते. आहात बदल करताना कायम डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
