ज्यादा मीठ खाणाऱ्यांनो सावधान… मृत्यूचा आकडा वाढला; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा काय ?
जागतिक आरोग्य संघटनेने मीठाच्या सेवनाबाबतचा मोठा इशारा दिला आहे. अत्याधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्यांना हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो, हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. मिठाचं सेवन किती प्रमाणात करावं, याची मानकंही आरोग्य संघटनेने ठरवली असून नागरिकांना मीठ कमी प्रमाणातच खाण्याचं आवाहनही केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आरोग्याच्या संदर्भात वारंवार सूचना देत असते. कोणत्या आजारापासून कसे सावध राहिले पाहिजे? कोणता आजार गंभीर आहे आणि कोणता नाही, याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली जाते. या शिवाय नागरिकांनी कोणते पदार्थ किती प्रमाणात खावेत, खाऊ नये याची माहितीही वारंवार दिली जाते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने मिठाबाबतची महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. खासकरून प्रमाणाच्या बाहेर मिठाचं सेवन करणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आहेत. ही माहिती देताना जगभरात अधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्यांच्या बाबत काय झालं? याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
जगभरातील हृदय रोगाशी संबंधित आजार वाढल्याने जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेच्या मते, यूरोपात रोज किमान 10 हजार लोकांचा हृदयशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. म्हणजे वर्षाला 40 लाख लोकांचा हृदयाशी संबंधित आजाराने मृत्यू होत आहे. म्हणजे यूरोपातील मृत्यूंच्या संख्येच्या 40 टक्के मृत्यू केवळ हृदयाशी संबंधित आजाराने होत आहेत.
9 लाख मृत्यू रोखता येतील
मिठाचं प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने हे मृत्यू होत आहे. मिठाच्या सेवनाचं प्रमाण कमी केल्यास हा आकडा कमी होऊ शकतो. मिठाचं सेवन किमान 25 टक्के कमी केलं पाहिजे. तसं झाल्यास 2030 पर्यंत 9 लाख मृत्यू रोखता येऊ शकतात, असं जागतिक आरोग्य संघटनेचे यूरोपातील डायरेक्टर हँस क्लूज यांनी सांगितलं.
एक चमचा मीठ पुरेसे
यूरोपात 30 ते 79 वयोगटातील तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती उच्च रक्तदाबाने पीडित आहे. त्याचं मुख्य कारण मीठ आहे. यूरोपात 53 पैकी 51 देशात प्रतिदिन मिठाचं सेवन करण्याचं प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा अधिक आहे. आरोग्य संघटनेने 5 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एक चमचा किंवा त्यापेक्षा कमी मिठ खाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु यूरोपात त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. प्रोसेस्ड फूड आणि स्नॅक्स खाण्यावर यूरोपातील लोक भर देतात, त्यात मीठाचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, असं सांगण्यात येत आहे.
मरणाऱ्यांमध्ये पुरुष अधिक
प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. जगात सर्वाधिक उच्च रक्तदाबाचे रोगी यूरोपात आहेत. आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयरोगाने मरण्याचं प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण 2.5 असं आहे.
मीठ खाणं घातकच
पूर्व यूरोप आणि मध्य आशियात पश्चिम यूरोपाच्या तुलनेत 30 ते 69 वर्षाच्या लोकांचं हृदय रोगाने मरण्याचं प्रमाण पाच टक्क्याने वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यावरून मीठ खाणं किती घातक आहे, हे स्पष्ट आधोरेखित होतं. ही आकडेवारी यूरोपातील असली तरी कुठल्याही देशातील व्यक्तीने मिठाचं अत्याधिक सेवन केल्यास त्याला हृदयाशी संबंधित आजाराला सामोरे जावं लागतं. त्यामुळे मीठ खाताना प्रमाणशीरच असलं पाहिजे, असंही आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.