
Sleeping problems : लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे…. लहानपणी आपण सर्वांनीच ही म्हण ऐकली असेल. रात्री लवकर झोपून (sleep early) सकाळी लवकर उठल्याने चांगले आरोग्य मिळते असा त्याचा मतितार्थ… मात्र आजकाल सगळंच बदललं आहे. धावपळीच्या युगात सगळ्यांचे रूटीन बिघडलेले असते. त्यातही बऱ्याच जणांचे आयुष्य त्यांच्या स्मार्टफोनने (smartphone) व्यापलेले असते. लोक रात्रभर मोबाईलवर काम करत, पिक्चर बघत नाहीतर सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत घालवतात.
यामुळे त्यांना रात्री वेळेवर झोप येत नाही. पण असे केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची सवय माणसाला मृत्यूच्या जवळ घेऊन जाते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. झोपेच्या कमतरतेचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही असतो. या आजारांमुळे वृद्धापकाळात मृत्यू होतो.
हा अभ्यास फिनलंडमधील फिनिश इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ येथे करण्यात आला आहे. ‘क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशनल’मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने शरीरात अनेक आजार निर्माण होतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कमी वयात मृत्यू होण्याचा धोका असतो. या अभ्यासात 23,000 लोकांवर संशोधन करण्यात आले.
22 वर्ष करण्यात आला अभ्यास
1980 ते 2022 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी सुमारे 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. अकाली मरण पावलेले हे सर्व लोक रात्री उशिरापर्यंत जागे असायचे. तर दुसरीकडे, जे लोक रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठायचे त्यांना मृत्यूचा धोका 10 टक्के कमी होता, असेही दिसून आले.
मात्र रात्री उशीरापर्यंत जागणे, दारू पिणे, धूम्रपान न करणे अशा घातक सवयी असलेल्या लोकांचा तरुण वयात मृत्यू होण्या धोका सर्वाधिक असल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
रात्री उशीरापर्यंत जागल्यास अनेक आजारांचा धोका
फिनिश संस्थेतील या अभ्यासाच्या लेखकाने सांगितले की, जी लोकं रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांना हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर तसेच मधुमेह यांसारखे अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. रात्री उशिरापर्यंत जागे राहणारे लोक लहान वयातच या आजारांना बळी पडतात. भविष्यात हे आजार मृत्यूचे कारण बनू शकतात. अशा परिस्थितीत लोकांनी झोपण्याच्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय प्रत्येक व्यक्तीने अंगिकारली पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी आठ तासांची झोप घेतली पाहिजे.