US-Iran :ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी देताच इराणकडून पाण्याखालच्या इंटरनेट केबल कापण्याचा इशारा, सगळं जगचं येईल संकटात
America-Iran Tension: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली. त्यानंतर चवताळलेल्या इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय इंटरनेट आणि दूरसंचार केबल्स कापण्याची धमकी दिली आहे.

America-Iran Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणविरोधात कठोर लष्करी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आखाती देशात पुन्हा मोठे युद्ध भडकण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी चवताळलेल्या इराणने समुद्राखालील आंतरराष्ट्रीय इंटरनेट आणि दूरसंचार केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे जगावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे. जगाचा संपर्कच तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. जगातील बँकिंग, आयटीसह अनेक उद्योगांवर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
फ्लोरिडा येथे एका जाहीर रॅलीला डोनाल्ड ट्रम्प यांनी संबोधित केले. इराणविरोधात आपले प्रशासन अजून एक मोठी लष्करी मोहीम हाती घेणार असल्याची धमकी त्यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या मोहिमेचा संदर्भही त्यांनी दिला. हा हल्ला कधी आणि केव्हा करणार याची माहिती ट्रम्प यांनी दिली नाही. हे युद्ध लवकर संपवण्याची क्षमता केवळ अमेरिकेत असल्याचा दावा करणारे ट्रम्प पुन्हा नवीन युद्धाची भाषा करत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे कच्चा तेलाचे भावाने लागलीच भडका घेतला. ट्रम्प यांच्या हडेलहप्पी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जागतिक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
इराणचा सायबर-डिजिटल युद्धाचा संदेश
रॉयटर्स संस्थेनुसार, इराणने आता युद्धाची रणनीती बदलली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला तोंड देतानाच त्यांनी आता नवीन धोरण स्वीकारले आहे. पर्शियन आखातातील समुद्राखालील आंतरराष्ट्रीय ऑप्टिकल फायबर आणि इंटरनेट केबल्स कापण्याची धमकीच इराणने दिली आहे. समुद्राखालील या केबल्स जागतिक दळणवळण आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा कणा आहे. या केबल्स तोडल्या अथवा कापल्या तर जगभरातील इंटरनेट आणि वित्तीय सेवा विस्कळीत होईल. यामुळे सर्वच अर्थव्यवस्थांना मोठा धोका निर्माण होईल. इंटरनेट ही सध्या मुलभूत गरज ठरली आहे.
जागतिक स्तरावर नव्या धमकीमुळे चिंता
इराण आणि अमेरिकेतील या ताज्या वाक् युद्धाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. कच्चा तेलाच्या किंमती लागलीच भडकल्या. तर इराणच्या इंटरनेट केबल्स कापण्याच्या धमकीने सर्वच देश धास्तावले आहेत. फ्रान्स, तुर्की, ब्रिटन आणि जर्मनीसह इतर अनेक प्रमुख देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. नवीन लष्करी संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि डिजिटल सेवांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.