
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत अनेकदा बोललेत की, मी सात युद्ध थांबवली आहेत, त्यामुळे मला शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ते शांततेच्या नोबलेसाठी खूप आतुर असल्याच दिसतं. पण नोबेल कमिटीवर याचा काही परिणाम झालेला नाही. आम्ही पूर्णपणे स्वायत्तता आणि स्वातंत्र्याने निर्णय घेतो, असं नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे. जानेवारी महिन्यात ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता संभाळली. त्यानंतर ते अनेकदा बोललेत की, मी नोबेल शांती पुरस्कारासाठी पात्र आहे. त्यांनी बरका ओबामा यांचा सुद्धा उल्लेख केला. बराक ओबामा यांना तर हा पुरस्कार खूप लवकर मिळाला, असं ट्रम्प म्हणाले.
मी आतापर्यंत 6 ते 7 युद्ध थांबवली आहेत. त्यामुळे नोबेल शांती पुरस्कारासाठी पात्र आहे. फक्त रशिया-युक्रेन युद्धच नव्हे, तर मी इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी सुद्धा तत्पर आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. नोबेल कमिटीचे सचिव क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन यांनी AFP ला एक इंटरव्यू दिला. त्यात ते म्हणाले की, “हे बरोबर आहे की, एका खास उमेदवाराबद्दल मीडियामध्ये चर्चा आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, यामुळे आमच्या निर्णयावर काही परिणाम होत नाही. आम्ही आमच्या निकषानुसारच निर्णय घेतो. यात कुठलाही बाहेरचा फॅक्टर काम करत नाही. ना कुठला दबाव चालतो”
नोबेल पुरस्काराची घोषणा कधी होणार?
यावर्षी नोबेल पुरस्काराची घोषणा 10 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या नावाची शिफारस बेंजामिन नेतन्याहू आणि अजरबैजानच्या इलहाम अलियेव यांनी केली आहे. त्याशिवाय पाकिस्तानचे स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीरही बोललेले की, ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांना यावेळी हा पुरस्कार मिळण्याची शक्यता कमी आहे.
ट्रम्प यांच्यासाठी कोणी लेटर पाठवलेलं?
याचं कारण आहे की, नोबेल पुरस्काराच्या नामांकनाची शेवटची तारीख 31 जानेवारी होती. बरोबर त्याच्या 11 दिवस आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळली. असं म्हटलं जातं की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा विचार झाला, तर तो पुढच्यावर्षी होईल. यावर्षी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची अजिबात शक्यता नाही. जुलै महिन्यात नेतन्याहू म्हणाले होते की, नोबेल पुरस्कारासाठी त्यांना ट्रम्प यांचं नाव सुचवायचं आहे. त्यासाठी त्यांनी नॉर्वेच्या नोबेल समितीला लेटरही पाठवलं होतं.