
भारतासह जगभरातील लोक नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र दुसरीकडे प्रशांत महासागरातील दोन देशांमध्ये नवीन वर्षांच्या सुरुवातीला सुरुवात झाली आहे. या देशांमघ्ये भारताच्या 9 तास आधी नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. नवीन वर्षाचे वेलकम सर्वप्रथम किरिबाटीमधील किरितिमाती या छोट्या बेटावर सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच, न्यूझीलंडच्या चॅथम बेटांवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
किरिबाटी हा देश प्रशांत महासागरात असलेला एक छोटा देश आहे, हवाईच्या दक्षिणेस आणि ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेला हा देश 33 लहान आणि मोठ्या प्रवाळ बेटांनी बनलेला आहे. या बेटांमधील अंतर 4000 किलोमीटरपर्यंत आहे. किरिबाटीला 1979 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे 1 लाख 16 हजार इतकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे किरिबाटी भौगोलिकदृष्ट्या हवाईच्या जवळ असले तरी, या ठिकाणी हवाईच्या आधी एक दिवस नवीन वर्ष साजरे केले जाते. 1994 मध्ये झालेल्या वेळेच्या बदलामुळे, सर्व बेटांवर समान तारीख निश्चित झाली आहे.
किरीबाटी देशातील अनेक बेटांची सरासरी उंची ही अतिशय कमी आहे. त्यामुळे समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे ती पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. मात्र तरीही या देशातील नागरिक मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करत असतात. या ठिकाणी सर्वात आधी संध्याकाळ देखील होते. आता भारतातही काही तासांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, याची तयारी जोरात सुरू आहे.
किरीबाटीनंतर, न्यूझीलंडच्या चॅथम बेटांवर नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या बेटावर फक्त 600 लोक राहतात. येथील लोक 2025 चे शेवटचे क्षण बारमध्ये एकत्र घालवत होते त्याचवेळी नवीन वर्षाचे आगमन झाले आहे. हॉटेल मालक टोनी क्रून यांनी सांगितले की, तरुण लोक उशिरापर्यंत जागे राहतील, मात्र वृद्ध लोक आरामाला पसंती देतात. या ठिकाणी 2026 चे स्वागत करणे खरोखरच खास आहे. कारण हे लोक जगापासून वेगळे आहेत मात्र ते एकमेकांशी जोडलेले आहोत.