UAE Saudi Arabia War : नव्या वर्षात नव्या युद्धाचा भडका, जगाचं टेन्शन वाढलं, थेट बॉम्बहल्ला केल्याने खळबळ!
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांत मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आता जगापुढे नव्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

Saudi Arabia And UAE War : आखाती प्रदेशातील संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबीया या दोन्ही मुस्लीम राष्ट्रांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्य आणि शस्त्रास्त्र सज्ज ठेवले आहे. विशेष म्हणजे सौदी अरेबियाने संयुक्त अरब अमिरातला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. याआधी सौदी अरेबियाने येमेनमधील मुकल्ला या बंदरावर मोठा बॉम्बहल्ला केला आहे. सौदी अरेबियाने केलेला हा हल्ला अगोदर हुथी बंडखोराविरोधात असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु सौदी अरेबियाचे कथित समर्थन असलेल्या शस्त्रांना नष्ट करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता, हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच आता या दोन्ही मुस्लीम राष्ट्रांमध्य मोठा तणाव निर्माण झाला असून नव्या वर्षात नव्या युद्धाचा भडका उडणार का? अशी धडकी संपूर्ण जगाला भरली आहे.
शस्त्रांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला हल्ला
सौदी अरेबियाच्या सैन्याने केलेल्या या कारवाईमुळे या देशाचे संयुक्त अरब अमिरातीसोबत असलेले मतभेद स्पष्ट झाले आहेत. या मतभेदांमुळे आता युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. सौदी अरेबियाच्या आरोपांनुसार संयुक्त अरब अमिरातीमधील फुजौराह या बंदराहून एक जहाज आले होते. कोणतीही परवानगी न घेता हे जहाज मुकल्ला या बंदरावर पोहोचले होते. या जहाजाने आपले ट्रॅकिंग सिस्टिम बंद केली होती. तसेच या जहाजाच्या माध्यमातून साऊथर्न ट्रान्झिशनल काऊन्सीलच्या (STC) फुटीरवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा केला जात होता. म्हणूनच सौदी अरेबियाने मुकल्ला या बंदरावर बॉम्बचा वर्षाव केला आहे.
हल्ला करण्याआधी नागरिकांना निर्देश
हा हल्ला करण्याआधी सौदी अरेबियाने बंदराच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी दाखल होण्याचे निर्देश दिले होते. लढाऊ जेट विमानाने हे हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यांच्या माध्यमातून आम्ही शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत, असा दावा सौदी अरेबियाने केला आहे.
दरम्यान, आखाती देशात हे दोन्ही देश एकमेकांपुढे उभे ठाकल्याने नवी चिंता वाढली आहे. सौदी अरेबियाने केलेल्या या हल्ल्याला संयुक्त अरब अमिरात नेमके कसे उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीने प्रत्युत्तर दिलेच तर युद्धाचा भडका उडणार का? अशी चिंताही आता व्यक्त केली जात आहे.
