
America And Iran Clash : सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात चांगलाच तणाव निर्माण झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकीच दिली आहे.त्यामुळे आता या दोन्ही देशांत भविष्यात मोठं युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी नुकतेच आमच्या युद्धनौका आणि सैनिक इराणच्या दिशेने निघाले आहेत, असे थेट सांगून जगात खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर आता इराणनेही जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. असे असतानाच इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगता दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण आता ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणदेखील मोठी तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
सध्या इराणमध्ये तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार आंदोलन चालू आहे. या आंदोलनात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खुली धमकी दिली आहे. आमच्या युद्धनौका इराणच्या दिशेने निघाल्या आहेत. सोबतच बरेच नौसैनिकही आहेत, असे थेट सांगून टाकले आहे. हे सांगताना त्यांनी आम्ही पाठवलेल्या युद्धनौकांचा उपयोग करण्याची गरज भासू नये, अशी अपेक्षा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची हत्या करू नका, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लाग शकतात, असेही अमेरिकेने इराणला सांगितले आहे.
अमेरिकेच्या या धमकीनंतर आता इराण देशाने बचावासाठी आतापासूनच खबरदारीची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याबाबत इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. अमेरिकेकडून झालेला कोणताही हल्ला हा थेट युद्ध म्हणूनच गृहीत धरला जाईल, असे इराणने आता ठरवले आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय माध्यमाने तसे वृत्त दिले आहे. अमेरिकेचे जे सैन्य आमच्याकडे येत आहे, ते हल्ल्यासाठी नसेल, अशी आम्ही अपेक्षा करतो. परंतु आम्ही कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम आहोत.कोणतेही संकट परतवून लावण्यासाठी आम्ही कठोरातील कठोर भूमिका घेऊन, अशी इराणची भूमिका आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.