
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ संपूर्ण जगालाच बसत आहे. या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनवाढ होण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिकेच्या मित्रराष्ट्र असलेल्य आखाती देशांवरही क्षेपणास्त्र डागल्याने द्रवरुप नैसर्गिक वायू अर्थात एलएनजी, सीएनजी, कच्चे तेल अशा सर्वच उर्जानिर्मितीसाठी गरजेच्या असणाऱ्या घटकांचा तुटवडा निर्माण होत आहे. म्हणूनच हे युद्ध लवकरात लवकर थांबावे यासासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न झाले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. इस्रायल-अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक गुरू अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याने तर हे युद्ध जास्तच भडकले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाबाबत खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पाकिस्तानचे नाव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एका न्यायालयात पाकिस्तानी नागरिकाने खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. पाकिस्तानी नागरिक असलेल्या या व्यक्तीचे नाव आसिफ मर्चंट असे असून तो 47 वर्षांचा आहे. या व्यक्तीवर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. याच आसिफने न्यायालयात खळबळजनक माहिती दिली आहे. इराणी गुप्तहेरांच्या सांगण्यानुसार मी या कटात सहभागी झालो होतो. त्यांनी माझ्या कुटुंबाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. जबरदस्तीने मी हे काम केले आहे, असे त्याने न्यायालयाला सांगितले आहे.
“माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. माझ्या कुटुंबाला धोका होता,” असा दावाही त्याने केला आहे. आसिफ मर्चंट अगोदर बँकेत काम करत होता. त्याने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2024 मध्ये त्याला इराणच्या एका हँडलरने अमेरिकेत जाण्यास सांगितले. तिथे जाऊ कोणालातरी मारावे लागेल, असे त्याला सांगण्यात आले. कोणाची हत्या करावी लागेल, याबाबत मर्चंट याला माहिती दिलेली नव्हती. नंतर मात्र डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन आणि निक्की हेली यांची हत्या करायची आहे, असे त्याला सांगण्यात आले.
दरम्यान, साफिने न्यायालयात दिलेल्या माहितीनंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याला ऑगस्ट 2024 मध्ये अटक करण्यात आले होते. तेव्हापासून तो मी निर्दोष असल्याचे सांगतो. तो या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.