Nepal Flash Flood : नेपाळमध्ये पुन्हा हाहा:कार? जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; काळजाचा ठोकाच चुकला…
नेपाळमध्ये दार्चुला जिल्ह्यातील चौलानी नदीजवळ भूस्खलन झाल्याने पुन्हा एकदा जलप्रलयाचा धोका निर्माण झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याने नदीचा प्रवाह बाधित झाल्यामुळे प्रशासनाने खालच्या भागातील नागरिकांना तात्काळ हायअलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलन वाढण्याची भीती असून, यामुळे महापूराची स्थिती निर्माण होऊ शकते.

महाभयंकर जलप्रलयातून नेपाळ सावरत आहे. नेपाळवरील संकट आता टळल्याचं सांगितलं जात असतानाच पुन्हा धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नेपाळवर आणखी एका नैसर्गिक ओढवलं आहे. दार्चुला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन सुरू झालं आहे. त्यामुळे चौलानी नदीचा प्रवाह काहीप्रमाणात बाधित झाला आहे. नदीत मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने प्रशासनाने नदीच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतर्क केलं आहे. जर सातत्याने भूस्खलन झालं आणि ढिगाऱ्याने नदीचा रस्ता अडवला तर अचानक बांध फुटून जलप्रलयासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नेपाळी नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
दार्चुला जिल्ह्यातील अपी हिमाल ग्रामीण नगर पालिका क्षेत्रातील भट्टार येथे भूस्खलन झालं आहे. डोंगरातून मोठ्या प्रमाणावर ढिगारा चौलानी नदीत पडत आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह बाधित झाला आहे. भूस्खलन सातत्याने सुरूच राहिलं तर नदीचा आकार छोटा होऊ शकतो. त्यामुळे पाणी जमा होऊन खालच्या भागाकडे वेगाने वाहू शकतं. त्यामुळे फ्लॅश फ्लड म्हणजे महाजलप्रलयाचा धोका निर्माण होऊ शकतो, असं दार्चुलाच्या जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.
नदीच्या किनाऱ्याला आणि नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ दूर जाण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. या ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आलं आह. हे जवान जवळपासच्या नागरिकांना धोक्याचा इशारा देत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत कारवाईसाठी तयार राहण्याच्या वारंवार सूचनाही हे लोक देत आहेत, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून हायअलर्ट
सुदूरपश्चिम प्रदेशाचे मुख्यमंत्री खगराज भट्ट यांनी स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना कोणत्याही संभाव्य परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रशासनाने महापूर आणि आपत्तीशी संबंधित मदतीसाठी आपत्कालीन नंबरही जारी केले आहेत. गरज पडल्यास नागरिकांना मदत मिळावी म्हणून हे नंबर जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, चौलानी नदीचा जलस्तर सामान्य असल्याचं सशस्त्र पोलीस दलाने म्हटलं आहे. मात्र, परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. बलांच स्थित नेपाळ चमोलिया हायड्रोपॉवर सुरक्षा बेसमधून सुरक्षा कर्मचाऱ्यांना संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. हे जवान नदीचा प्रवाह, वेग, वाढता जलस्तर आणि नदीच्या आजपासच्या गावांवर नजर ठेवून आहेत. या गावातील नागरिकांना वारंवार अलर्ट दिला जात आहे.
महाकाली नदीला जाऊन मिळते
चौलानी नदीला चमेलिया नदी म्हणूनही ओळखलं जातं. ही नदी अपी हिमाल क्षेत्रातून उगम पावते आणि पुढे महाकाली नदीला जाऊन मिळते. महाकाली नदी नेपाळ आणि भारताच्या दरम्यानच्या सीमेचा एक भाग आहे. अशावेळी चौलानी नदीला महापूर येण्याची स्थिती निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे.
पावसाने टेन्शन वाढवलं
नेपाळमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आता चौलानी नदीला महापूर येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. सध्या तरी नदीचा जलस्तर सामान्य आहे. पण नदी परिसरात डोंगरातून भूस्खलन होत असल्याने मातीचे मोठमोठे ढिगारे नदीत येऊन पडत आहेत. त्यामुळे नदी कधीही धोक्याच्या स्थितीत येण्याची शक्यता आहे. त्यातच या परिसरात सातत्याने पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
