3500 फूट विमानातून कोसळला, गार्डनमध्ये मृतदेह सापडला

केनिया एअरवेजचे विमान लंडनच्या आकाशातून जात असताना अचानक एक व्यक्ती विमानातून खाली पडला. हा व्यक्ती पडला तेव्हा विमान 3500 फूट उंचावरुन उडत होते.

3500 फूट विमानातून कोसळला, गार्डनमध्ये मृतदेह सापडला

लंडन : केनिया एअरवेजचे विमान लंडनच्या आकाशातून जात असताना अचानक एक व्यक्ती विमानातून खाली पडला. हा व्यक्ती पडला तेव्हा विमान 3500 फूट उंचावरुन उडत होते. संबंधित व्यक्ती गुपचूप विमानाच्या लँडिंग गेअरमध्ये लपून बसला होता. इतक्या उंचावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

संबंधित व्यक्तीचा लपून विमान प्रवास करत लंडनला जाण्याचा विचार होता. त्यासाठी तो विमानाच्या लँडिंग गेअरच्या ठिकाणी लपून बसला. मात्र, विमान 322 किलोमीटर प्रतितास वेगाने 3500 फूट उंचावरुन उडत असतानाच तो खाली पडला. विमानातून थेट एका बागेत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा व्यक्ती जेव्हा बागेत पडला तेव्हा तेथे 3 फूट अंतरावरच एक मुलगा बसलेला होता. अचानक खाली पडून झालेल्या आवाजाने तो मुलगा प्रचंड घाबरला. ती व्यक्ती आपल्या अंगावर न पडता इतर ठिकाणी पडली. माझ्या अंगावर पडला असता तर माझाही मृत्यू झाला असता असे म्हणत त्या मुलाने स्वतःला नशीबवान म्हटले. या मुलाला बरेच वेळ काय घडले हेच कळत नव्हते. त्याला मानसिक धक्का बसल्याने त्याला सुरुवातीला बोलताही येत नव्हते.

खाली पडण्याचा आवाज प्रचंड मोठा होता. या आवाजाने बागेच्या शेजारी असलेल्या लोकांनाही आश्चर्य वाटले. कशाचा आवाज आहे हे पाण्यासाठी त्यांनी बागेकडे धाव घेतली, तर तेथे त्यांना मृतदेह दिसला. बागेत मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

संबंधित मृतदेह नेमका स्त्रीचा आहे की पुरुषाचा हेही ओळखणे कठीण जात होते, इतकी मृतदेहाची वाईट अवस्था झाली होती. संबंधित व्यक्तीचा मृत्यू खाली पडल्यानंतर झाला की त्याआधीच झाला हेही अजून स्पष्ट झालेले नाही. कारण तो खाली पडण्याआधी त्याला -60 अंश तापमानात ऑक्सिजनसाठी 9 तास झगडावं लागलं असेल.

विमानांनी हिथ्रो विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमानाच्या गेअर कंपार्टमेंटमध्ये एक बॅग, पाणी आणि खाण्याच्या वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका व्यक्तीने हिथ्रो विमानतळावर या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला, तेव्हा त्यांनी दर 5 वर्षांनी अशी घटना घडत असल्याचे सांगितले. याआधी एका व्यक्तीचा असाच प्रवास करत असताना थंडीत गोठून मृत्यू झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *