
इराण-इस्रायल युद्ध आता थांबलं आहे. दोन्ही देशांमध्ये सीजफायर झालं आहे. पण मागच्या आठवड्यात हे युद्ध सुरु असताना अमेरिकेने इराणच्या तीन अणवस्त्र प्रकल्पांवर B-2 बॉम्बरने विमानाने हल्ला केला होता. 13 हजार किलोपेक्षा जास्त वजनाचे GBU-57 हे बॉम्ब नतांज, एस्फान आणि फॉर्डो या तीन ठिकाणी टाकले होते. या बॉम्बला बंकर बस्टर बॉम्ब म्हटलं जातं. कारण जमिनीच्या खाली असलेले बंकर उद्धवस्त करण्यासाठी या बॉम्बची निर्मिती करण्यात आली आहे. फॉर्डो येथील इराणचा अणवस्त्र प्रकल्प असाच जमिनीखाली उभारला होता. कुठल्याही मिसाइलने हा प्रकल्प नष्ट होऊ शकला नसता. यासाठी GBU-57 सारख्याच शक्तीशाली बॉम्बची गरज होती. म्हणून अमेरिका या युद्धात उतरली. अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या हल्ल्याच्या यशस्वीतेवर अनेक शंका, कुशंका आणि प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा सिलसिला सुरु आहे.
काल अमेरिकेच्याचा एका गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा हवाला देऊन या हल्ल्यात इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांच फार नुकसान झालेलं नाही, असा दावा करण्यात आला होता. इराणचा अणवस्त्र कार्यक्रम काहीवर्ष नाही, तर फक्त काही महिने मागे गेलाय असं अमेरिकन माध्यमांनी लीक झालेल्या या गोपनीय रिपोर्टचा हवाला देऊन म्हटलं होतं. बॉम्ब पडल्यामुळे त्यांचं जास्त नुकसान झालेलं नाही. केवळ प्रवेशद्वार बंद झालय. पण प्लान्टची संरचना सुरक्षित आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही काही सेंट्रीफ्यूज काम करण्याच्या स्थितीमध्ये आहेत. इराणच यूरेनियम भंडार संपलेलं नाही, ते सुरक्षित आहे, असं या रिपोर्टच्या हवाल्याने म्हटलं होतं. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री हा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचा दावा केला होता.
CIA ने काय म्हटलय?
मीडियामध्ये सुरु असलेल्या बातम्यांमुळे इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाच खरच किती नुकसान झालय? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. रोज वेगवेगळ्या बातम्या सुरु आहेत. त्यामुळे आता CIA च्या एका महत्वाच्या अधिकाऱ्यानेच समोर येऊन या हल्ल्याबद्दलच वास्तव सांगितलं आहे. अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये इराणच्या न्यूक्लियर प्लान्टच मर्यादीत नुकसान झाल्याचा दावा सीआयएच्या अधिकाऱ्याने खोडून काढला. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांच मोठं नुकसान झालं आहे. त्यांना हे प्रकल्प पुन्हा उभे करण्यासाठी कित्येक वर्ष लागतील असं सीआयएने म्हटलं आहे.
तुलसी गब्बार्ड यांनी काय आरोप केला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने इराण हल्ल्याचा विषय हाताळला, त्याचं क्रेडिट त्यांना मिळू नये म्हणून मीडियाकडून निवडक गोपनीय विश्लेषण लीक करुन प्रचार सुरु आहे असा आरोप राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गब्बार्ड यांनी केला. अमेरिकन एअर स्ट्राइकमध्ये नतांज, एस्फान आणि फॉर्डो येथील अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले आहेत असा दावा तुलसी गब्बार्ड यांनी केला.