आम्हा अमेरिकन लोकांची इच्छा…, ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यानंतर ममदानी यांची पहिली प्रतिक्रिया, झाले चांगलेच भावुक

अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत, त्यावर आता न्यूयार्कचे महापौर जोहरान ममदानी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या त्यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

आम्हा अमेरिकन लोकांची इच्छा..., ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यानंतर ममदानी यांची पहिली प्रतिक्रिया, झाले चांगलेच भावुक
Mamdani
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 3:18 PM

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला, या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांना इराणने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान या युद्धावर न्यूयॉर्क शहराचे मेयर जोहरान ममदानी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जोहरान ममदानी यांनी अमेरिका आणि इस्रायने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हे एक अवैध आक्रमण असल्याचं ममदानी यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विटरवर पोस्ट केली आहे. ‘ आज अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या अवैध आक्रमणामुळे भीषण युद्धाची शक्यता आहे. शहरांवर बॉम्ब हल्ले, नागरिकांची हत्या, सध्या जे घडत आहे, ते घडावं अशी आमच्या अमेरिकन नागरिकांनी इच्छा नाहीये’ असं ममदानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढे बोलताना ममदानी यांनी म्हटलं की, सत्ता परिवर्तनासाठी अजून एखादं युद्ध व्हावं अशी आमच्या अमेरिकन लोकांची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला वाढत्या महागाईपासून दिलासा हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. सध्या माझं सर्व लक्ष हे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आहे. सध्याची परिस्थिती पहाता न्यूयॉर्कमधील संपूर्ण पोलीस दल अलर्ट मोडवर आहे, मी सर्वांच्या संपर्कात आहे. न्यूयॉर्क शहराची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. गरजेनुसार योग्य ती पाऊलं उचलली जातील.

दरम्यान अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये अनेक इराणी लोक वास्तव्याला आहेत, त्यांना देखील ममदानी यांनी संरक्षणाची हमी दिली आहे. तुम्ही आमचे शेजारी आहात, तुम्ही छोटे व्यावसायिक आहात, कोणी कलाकार आहे, कोणी श्रमिक आहे. परंतु तुम्ही सर्व जण इथे न्यूयॉर्कमध्ये सुरक्षित आहात असं ममदानी यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाईने देखील अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे, मीनाब येथील मुलींच्या शाळेवर बॉम्ब हल्ला झाला, या घटनेत 50 पेक्षा अधिक मुलींचा मृत्यू झाला. या घटनेचा उल्लेख करताना आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो असं यूसुफजाई यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us