युक्रेनचं आता काही खरं नाही, रशियाकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. रशियाकडून युक्रेनवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे.

युक्रेनचं आता काही खरं नाही, रशियाकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी
russia attack
| Updated on: Jul 20, 2025 | 4:34 PM

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. या युद्धाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. रशियाकडून युक्रेनवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू आहे. बुंडेसवेरचे मेजर जनरल आणि युक्रेनमधील प्रमुख अधिकारी ख्रिश्चन फ्रायडिंग यांनी युक्रेनवर एकाच वेळी 2 हजार ड्रोनचा हल्ला होण्याची शक्यता आहे. रशियाने गेल्या काही दिवसांपासून हल्ले वाढवल्याने ख्रिश्चन फ्रायडिंग यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे.

ख्रिश्चन फ्रायडिंग यांच्या अंदाजानुसार रशिया ड्रोनद्वारे युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना एकाच वेळी टार्गेट करण्याची शक्यता आहे. रशियाकडून युक्रेनवर 2000 ड्रोन डागले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास युक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमला हे ड्रोन रोखणे कठीण होण्याची शक्यता आहे. यात युक्रेनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

रशियाकडून तयारीला सुरुवात

समोर आलेल्या माहितीनुसार, रशिया 20 लाख एफपीव्ही ड्रोन बनवणार आहे. तसेच कामिकाझे ड्रोन देखील बनवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे युक्रेनवर दररोज 1 हजार ड्रोनने हल्ले करणे शक्य झाले आहे. रशियाने जून 2025 मध्ये युक्रेनवर 5337 ड्रोनने हल्ला केला होता. आगामी काळात पॅट्रियट एअर डिफेन्ससह गेरन-2 सारख्या ड्रोनला थांबवणे सोपे नाही. हे ड्रोन पॅट्रियट सारख्या एअर डिफेन्स सिस्टम नष्ट करत असल्याचे समोर आले आहे.

युक्रेनच्या निशाण्यावर रशियाचे ड्रोन कारखाने

रशिया हल्ल्याची तयारी करत असताना युक्रेन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी रशियाच्या ड्रोन कारखान्यांवर लक्ष करुन रशियाला प्रत्युत्तर देऊ शकतो. याआधीही युक्रेनने नियमितपणे रशियातील लष्करी कारखान्यांवर हल्ले केले आहेत. आता आगामी काळात पाश्चात्य देशांकडून युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रे पुरवली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

जर्मनी आणि अमेरिकेकडून युक्रेनला मदत

जर्मनीकडून जुलैच्या अखेरीस युक्रेनला लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे दिली जाणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अतिरिक्त शस्त्रे पुरवण्यासाठी नाटोसोबत करार करण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांकडून भीषण हल्ले होण्याची शक्यता आहे.