
जगभरात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. येत्या ६ आणि ७ जुलै रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत ते सहभागी होणार नाहीत. १२ वर्षांत प्रथमच ब्रिक्सच्या बैठकीत जिनपिंग सहभागी होणार नाही. यामुळे शी जिनपिंग यांचा काळ संपला का? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे कुठेही सार्वजनिक वक्तव्यही दिसत नाही. त्यांची कुठे मुलाखतही प्रसिद्ध झाली नाही. दुसरीकडे त्यांचे जवळचे अधिकारीसुद्धा बदलण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सम्राट यांचा शेवट होणार आहे, अशी भविष्यवाणी केली होती. ती आता खरी होणार आहे की काय? त्यामुळे चीनमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. चीनमध्ये खरी राजवट कोणाची आहे, जाणून घेऊ या…
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेल्या दोन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. शी जिनपिंग ७ ते १० मे पर्यंत रशियाच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ते कुठेही दिसले नाहीत. त्याचे कुठे वक्तव्य आले नाही. कुठे फोटोही प्रसिद्ध झाला नाही. तसेच सोशल मीडिया प्लॅटफार्मवर त्यांची एकही पोस्ट दिसली नाही. यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षात (सीसीपी) सत्ता परिवर्तन होऊ शकते का? याबद्दल अटकळ बांधली जात आहे. शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) अध्यक्ष आहेत. त्यामुळे खरी सत्ता शी जिनपिंग यांच्याकडेच होती.
जपानी मीडिया जपान फॉरवर्डच्या रिपोर्टनुसार, चीनच्या पीपल्स डेली या वृत्तपत्रातून शी जिनपिंग यांचे नाव आणि फोटो २ ते ४ जून दरम्यान प्रसिद्ध झाले नाही. ही एक असामान्य घटना आहे. त्याऐवजी चीनच्या वृत्तपत्रात कार्बन उत्सर्जनसंदर्भातील लेख प्रसिद्ध झाला. मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या स्टेट काउंसिलमधील ५० पेक्षा जास्त मंत्री आणि अधिकाऱ्यांनी निष्ठेची शपथ घेतली. त्यावेळी शी जिनपिंग नव्हते. शी जिनपिंग बेपत्ता असल्यामागे दोन महत्वाच्या शक्यता असू शकतात.
मागील वर्षी चीनचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि सैन्य अधिकारी बेपत्ता झाले होते. त्यानंतर अनेक आठवड्यांनी चीनकडून स्पष्टीकरण करण्यात आले. या लोकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते, असा खुलासा चीनकडून करण्यात आला. कम्युनिष्ट पक्षाने त्यांच्याविरोधात चालवण्यात येणाऱ्या खटल्यासंदर्भातही माहिती दिली नाही. सर्व काही गोपनीय पद्धतीने झाले होते. अलीबाबा कंपनीचे फाउंडर जॅक मा यांनीही सरकारवर टीका केली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. अनेक महिन्यांनी सार्वजनिक ठिकाणी ते दिसले. परंतु त्यानंतर त्यांनी सरकारविरोधात कधी वक्तव्य केले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय लष्करी आयोगाचे (सीएमसी) पहिले उपाध्यक्ष जनरल झांग युक्सिया हे सध्या चीनमधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असू शकतात. झांग २४ सदस्य असलेल्या शक्तीशाली पोलीट ब्यूरोचे सदस्य आहे. त्यांना सीसीपीच्या वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा आहे. ते चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंतोओ यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहे. शी जिनपिंग यांच्या तुलनेत ते कमी कट्टरवादी आहेत. शी जिनपिंग यांनी आपले विचार ‘शी जिनपिंग थॉट’ म्हणून प्रसिद्ध केले. चीनमधील शाळांमध्ये त्याचे शिक्षण दिले जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वांग यांग यांना शी जिनपिंग यांचे उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात आहे. वांग यांग हे एक टेक्नोक्रेट आहेत. २०२२ मध्ये चीनमध्ये सर्वोच्च नेतृत्वासाठी त्यांना एक मजबूत दावेदार मानले जात होते. शी जिनपिंग यांच्या जवळच्या लोकांना काढून टाकणे, ‘शी जिनपिंग थॉट’ हळूहळू संपवणे आणि वांग सारख्या तंत्रज्ञाचे पुनरागमन हे शी जिनपिंग यांना हळूहळू सत्तेबाहेर बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत असल्याचे संकेत आहेत.
बाझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बैठकीत शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत. त्यामुळे या बैठकीत त्यांच्याऐवजी कोण जाणार? हा प्रश्न आहे. जिनपिंग यांची जागा चीनी प्रीमियर ली कियांग घेणार आहे. ली कियांग यांनी यापूर्वी २०२३ मध्ये भारतात झालेल्या जी २० परिषदेत जिनपिंग यांच्याऐवजी सहभाग घेतला होता. चीनसुद्धा ब्रिक्समध्ये शी जिनपिंग यांची अनुपस्थिती ‘शेड्यूलिंग संकट’ म्हटले आहे.
चीन भारताचा शेजारी राष्ट्र आहे. त्यामुळे त्या देशांमधील घडामोडींचा परिणाम भारतावर होणार आहे. दोन्ही देशांमध्ये सीमा वाद आहे. त्यामुळे चीनमधील घडामोडींबाबत भारताला सतर्क राहण्याची गरज आहे. चीन देशातंर्गत दबाब कमी करण्यासाठी बाहेरील प्रकरणांचा वापर करत असल्याचे नेहमी म्हटले जाते. चीन नेहमी सीमा वाद जिवंत ठेवण्याचाही प्रयत्न करतो. तज्ज्ञांच्या मते, चीनमधील घटनाक्रमामुळे चीनी हॅकर भारतावर सायबर हल्ला करु शकतात. भारतात अडचणी निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती देऊ शकतात. चीन संयुक्त राष्ट्रामध्येही भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करु शकतो. तसेच सुधारणा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
सन २०१३ मध्ये शी जिनपिंग यांनी चीनची सूत्र हातात घेतली होती. त्यानंतर एक आर्थिक आणि लष्करी महासत्ता म्हणून चीन उदयास आला. जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनने अमेरिकेसोबतही संघर्ष केला. परंतु आता जिनपिंग राष्ट्रपती असले तरी सत्तेचे चावी दुसऱ्याकडेच असल्याचे म्हटले जात आहे. सध्या कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल मिलिट्री कमीशनचे पहिले उपाध्यक्ष जनरल झांग यूक्सिया निर्णय घेत आहेत. चीनमध्ये राष्ट्रपती दोन कार्यकाळापेक्षा जास्त राहू शकत नाही. परंतु कोरोना काळापूर्वी चीनने त्यात बदल केला. त्यामुळे आजीवन त्यांना राष्ट्रपतीपदी राहण्याची महत्वाकांक्षा होती. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनीही घटनेत त्यासाठी बदल केला होता.