गॅरंटी की वॉरंटी, ग्राहकांसाठी काय आहे अधिक फायदेशीर? खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या फरक
Difference Between Guarantee And Warranty: नवीन वस्तू खरेदी करताना आपण वॉरंटी आणि गॅरंटी हे शब्द ऐकतो. मात्र, या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि ग्राहकांसाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो, हे अनेकांना माहीत नसते. खरेदी करण्यापूर्वी या दोन्ही गोष्टींबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

नवीन मोबाइल, टीव्ही, फ्रिज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना दुकानदारांकडून अनेकदा वॉरंटी आणि गॅरंटीबद्दल सांगितले जाते. मात्र, बहुतांश ग्राहकांना या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटतो. प्रत्यक्षात वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. एखादी वस्तू खराब झाल्यास ती दुरुस्त करून मिळणार की बदलून मिळणार, हे संबंधित कंपनीच्या अटींवर अवलंबून असते. त्यामुळे खरेदी करताना केवळ किंमत आणि ऑफर्स पाहण्याऐवजी वॉरंटी आणि गॅरंटीच्या अटीही समजून घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी.
वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये काय फरक आहे?
एखाद्या वस्तूवर गॅरंटी मिळत असल्यास कंपनीच्या अटींनुसार ती वस्तू दुरुस्त करून मिळू शकते, बदलून मिळू शकते किंवा काही प्रकरणांमध्ये पैसे परत मिळू शकतात. तर वॉरंटीमध्ये ठरावीक कालावधीत वस्तूतील काही प्रकारचे बिघाड दुरुस्त करून दिले जातात किंवा खराब झालेले पार्ट बदलले जातात. मात्र, या सुविधा संबंधित कंपनीच्या नियमांवर अवलंबून असतात.
वॉरंटी आणि गॅरंटीचा कालावधी तपासा
कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावर किती वर्षांची वॉरंटी किंवा गॅरंटी मिळते, हे तपासणे महत्त्वाचे आहे. काही वस्तूंवर एक वर्षाची वॉरंटी असते, तर काही वस्तूंच्या वेगवेगळ्या पार्ट्ससाठी वेगळा कालावधी असतो. उदाहरणार्थ, फ्रिज आणि त्याच्या कॉम्प्रेसरची वॉरंटी वेगवेगळी असू शकते.
वस्तू बदलून मिळणार की पैसे परत मिळणार?
खरेदी केलेली वस्तू खराब झाल्यास कंपनी ती दुरुस्त करून देणार, नवीन वस्तू देणार की पैसे परत करणार, हे आधीच समजून घ्या. विशेषतः टीव्ही, फ्रिज, एसी आणि मायक्रोवेव्ह सारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना या अटी तपासले पाहिजे. कारण प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे असू शकतात.
वॉरंटीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
वॉरंटीमध्ये प्रत्येक प्रकारचा बिघाड दुरुस्त करून मिळेलच असे नाही. अनेक कंपन्या उत्पादनातील तांत्रिक दोष किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टसाठी वॉरंटी देतात. मात्र, मोबाइल खाली पडून स्क्रीन फुटणे, पाण्यामुळे नुकसान होणे किंवा चुकीच्या वापरामुळे वस्तू खराब होणे यांसारख्या गोष्टी वॉरंटीमध्ये समाविष्ट नसू शकतात.
बिल आणि वॉरंटी कार्ड जपून ठेवा
कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर तिचे बिल आणि वॉरंटी कार्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. वस्तू खराब झाल्यास कंपनीकडून बिल, सीरियल नंबर किंवा वॉरंटीशी संबंधित कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. सध्या अनेक कंपन्या डिजिटल बिल आणि ऑनलाइन वॉरंटी रजिस्ट्रेशनची सुविधाही देतात.
सर्व्हिस सेंटर आणि अतिरिक्त खर्चाची माहिती घ्या
वस्तू खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीचे सर्व्हिस सेंटर आपल्या शहरात कुठे आहे, याची माहिती घ्या. तसेच वॉरंटीच्या काळात वस्तू दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस चार्ज, व्हिजिट चार्ज किंवा इतर कोणते शुल्क द्यावे लागणार आहे का, हेही विचारा. काही वेळा पार्ट्स बदलण्याची सुविधा मोफत असली तरी इतर शुल्क आकारले जाऊ शकते.