असं एक गाव जिथे फक्त एका किडनीवर जगतात लोक, कुठे आहे ‘वन किडनी व्हिलेज’ ?
या जगात एक असं गाव आहे, जिथले लोक फक्त एका किडनीवर जगतात. ही कोणती परंपरा आहे की एखादा डिसऑर्डर आहे की लोकं कोणत्या मजबुरीमुळे किडनी विकतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

‘वन किडनी विलेज’… नाव ऐकूनच विचित्र वाटलं ना ? पण हेच खरं आहे. एक असं गाव आहे जिथे बहुतांश लोकांची फक्त एकच किडनी आहे. या गावातील लोकांना एखादा रहस्यमयी आजार किंवा काही डिसऑर्डर आहे असं नव्हे. या गावात अतिशय सुदृढ, धडधाकट मुलांचाच जन्म होतं आणि लोकांना दोन किडनी असतात, पण नंतर अशी काही परिस्थिती निर्मआण होते की 10 पैकी किमान 8 लोकांना आपली एक किडनी काढावी लागतो. कोणतं आहे ते ‘वन किडनी व्हिलेज’ आणि ते आहे तरी कुठे ? चला जाणून घेऊया.
‘वन किडनी व्हिलेज’ हे अफगाणिस्तानातील छोटसं गाव आहे. तिथल्या बहुतांश पुरूषांनी आणि महिलांनी त्यांची एक किडनी काढली आहे. हे कोणत्याही आजारामुळे किंवा विकारामुळे केलेले नाही. या गावातील लोक आपल्या किडनी विकतात. आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मजबुरीने किडनी विकावी लागते, अशी माहिती समोर आली आहे.
कुठे आहे हे वन किडनी व्हिलेज ?
अल जझीराच्या रिपोर्टनुसार, पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात शहराच्या बाहेर ‘ सायशानबा बाजार ‘ नावाचं एक गाव आहे. या गावात असे अनेक लोक राहतात, ज्यांनी अनेक वर्षे उदरनिर्वाहासाठी संघर्ष केल्यानंतर इथे विस्थापित होत आश्रय घेतला. हे गाव ‘एक-किडनी गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावातील जवळपास प्रत्येक घरातील एका व्यक्तीने आपली एक किडनी विकली आहे. गरीब कुटुंबांमध्ये किडनी विकून मिळणाऱ्या पैशांबाबत माहिती पसरल्याने ही प्रथा वाढली.
गरिबीतून बाहेर पडण्याच्या आशेने एकाच कुटुंबातील पाच भावांनी गेल्या चार वर्षांत आपली एकेक किडनी विकली. अवयवदान किंवा अवयव विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नाही. मात्र, संबंधित व्यक्तीची संमती घेणं आवश्यक असतं असं उत्तरेकडील मजार-ए-शरीफ शहरातील एका रुग्णालयाच्या माजी सर्जनने सांगितलं.
डोनरच्या परवानगीचं होतं व्हिडीओ रेकॉर्डिंग
हेरैत येथे जी ट्रान्सप्लांट होतात त्यातील बहुताँश ही दोन हॉस्पिटल्समध्ये केले जातात. त्यापैकी एका हॉस्पिटलच्या सर्जननेही याची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, डोनरची संमती ही सर्वात महत्त्वाची असते. ते म्हणाले, “ आम्ही त्यांच्याकडून लेखी परवानगी घेतो आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करतो. गेल्या पाच वर्षांत हेरातमध्ये शेकडो शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्ण किंवा डोनर कुठून आला आहे, याची आम्ही कधीही चौकशी केलेली नाही. ते आमचं काम नाही.”, असं त्यांनी पुढे नमूद केलं.
डिसेंबर 2021 पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य आयोगाच्या (UNHCR) अंदाजानुसार, अफगाणिस्तानच्या 55 टक्के लोकसंख्येला, म्हणजे जवळपास 2.3 कोटी लोकांना तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता.
‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, तालिबान सत्तेवर येण्याच्या खूप आधीपासूनच अफगाणिस्तानमध्ये किडनीचा व्यापार ही एक समस्या होती. मात्र, तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार केवळ ‘वन किडनी व्हिलेज’ येथेच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या अनेक भागांमध्ये वाढला. म्हणजेच आता अफगाणिस्तानमध्ये केवळ एकच ‘वन किडनी व्हिलेज’ राहिलेलं नाही. स्वेच्छेने आपली किडनी विकण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023 पर्यंत एका किडनीसाठी 3 ते 4 हजारर डॉलर्स मिळायचे. मात्र आता त्याची किंमत स्वस्त झाली आहे. आता लोक 1500 डॉलर्समध्येही किडनी विकायला तयार होतात.
