
Khajuraho’s Mysterious Temple : भारतात शेकडो प्राचीन आणि अद्भुत अशी मंदिरं आहेत. विशेष म्हणजे यातील काही मंदिरं ही मोठी रहस्यमयी आहेत. असेच एक मंदीर जगभरात प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खजुराहो येथे आहे. या मंदिराचे नाव मतंगेश्वर महादेव मंदीर असून त्याबाबत अनेक आख्यायिका आहेत. यातलीच एक आख्यायिका म्हणजे या मंदिरातील शिवलंगाची उंचीच दरवर्षी वाढते. विशेष म्हणजे या शिवलिंगाच्या बरोबर 18 फूट खोलीवर एक अद्भुत आणि अजब रहस्य दडलेले आहे, असेही तेथील स्थानिक दावा करतात.
खजुराहोच्या पश्चिमी समुहातील मंदिरांजवळ हे मतंगेस्वर महादेव मंदीर आहे. अन्य मंदिरांच्या तुलनेत हे एक आगळेवेगळे मंदीर आहे. या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. या मंदीर परिसरात फारच शांत वातावरण आहे.
मतंगेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची उंची दरवर्षी एका तिळाएवढी वाढते असे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही वाढ सातत्याने होत आहे, असा समज तेथील लोकांमध्ये आहे. या दाव्याला मात्र अद्याप कोणताही वैज्ञानिक ठोस आधार मिळालेला नाही. परंतु स्थानिक लोकांच्या विश्वासामुळे लोक या मंदिराला भेट देतात.
सध्या या मंदिरातील शिवलिंग 9 फूट उंच आहे. या शिवलिंगाची लांबी धरतीमध्ये 18 फुटापर्यंत वाढेल, तेव्हा या जगाचा नाश होईल, असा येथील लोकांचा समज आहे.
या मंदिराबाबत दुसरी एक आख्यायिका आहे. मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या 18 फूट खाली जगातील सर्वांत मोठं रहस्य दडलेलं आहे, असं सांगितलं जातं. काही लोकांच्या मते या शिवलिंगाच्या खाली प्राचीन खजाना दडलेला आहे. तर काही लोकांना या शिवलिंगाखाली गुप्त ज्ञान आहे, असं वाटतं. मात्र हे दावे खरे आहेत, असं सांगणारा कोणताही वैज्ञानिक आधार अजूनतरी समोर आलेला नाही.
दरम्यान, या मंदिराची निर्मिती ही 9 व्या आणि 10 व्या शतकात केल्याचे सांगितले जाते. खजुराहोच्या अन्य मंदिरांप्रमाणेच हे मंदीरदेखील नागर शैलीतील आहे. मंदिराच्या गर्भगृहात एक विशाल असे शिवलिंग आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)