स्मार्ट वॉच करतंय शरीरावर घातक विषाणूंचा मारा, कसे रोखाल?

दिवसाच्या चोवीस तासातील बहुतांश वेळ स्मार्ट वॉच आपल्या हातात असते. स्मार्ट वॉचमध्ये वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान शरीरातील ऑक्सिजनपातळी, कॅलरीचे मोजमाप करते. परंतु, अलीकडे झालेल्या संशोधनानुसार हेच स्मार्टवॉच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरताना दिसून आलेय.

स्मार्ट वॉच करतंय शरीरावर घातक विषाणूंचा मारा, कसे रोखाल?
SMART WATCH
| Updated on: Dec 14, 2023 | 10:03 PM

मुंबई | 14 डिसेंबर 2023 : पूर्वीच्या घड्याळ्याची जागा आता डिजिटल अर्थात स्मार्ट वॉचने घेतलीय. स्मार्ट वॉचमुळे काही गोष्ठी सहज शक्य होत आहेत. विशेष म्हणजे मोबाईल फोनला स्मार्ट घड्याळ कनेक्ट करू शकता. फोनप्रमाणेच स्मार्टवॉचमध्येही काही आवश्यक अॅप्लिकेशन्स असतात. ब्लूटूथ, जीपीएस, हार्ट रेट मॉनिटर, अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि बरेच यासारख्या अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांसह स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचचे अनेक उपयोग असले तरी त्याचा अति वापर हे शरीराला धोकादायक ठरतंय. एका संशोधनामधून ही बाब अधोरेखित करण्यात आलीय.

स्मार्ट वॉच अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह येतात. स्टँडअलोन स्मार्टवॉचमध्ये कॉल किंवा मेसेज करण्यासाठी सिम कार्ड वापरू शकता. यात फिटनेस ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, GPS नेव्हिगेशन यासारखी आधुनिक वैशिष्ट असतात. काही स्मार्ट वॉच गुगल असिस्टंटला सपोर्ट करतात. ज्यामुळे फक्त आवाजाद्वारे घड्याळाला सूचना देऊ शकतो. हे स्मार्टवॉच हृदयाचे ठोके आणि तुम्ही किती कॅलरीज बर्न केल्या आहेत हे मोजण्यासही सक्षम असतात.

स्मार्ट वॉचच्या अतीवापरामुळे काही घातक विषाणू शरीरात नकळत प्रवेश करतात. आतडे, रक्त, फुफुस यामध्ये प्रवेश करून ते शरीराला कमजोर आणि संक्रमित करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी करतात. यामुळे वारंवार सर्दी खोकला, ताप, अतिसार, आतड्याचे आजार होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.

दिवसातील बहुतांश काळ आपण स्मार्टवॉच धारण करतो. स्मार्टवॉचसाठी जो बँड वापरला जातो तो प्लास्टिक पासून बनवलेला असतो. याच रिस्ट बँडवर दिवसागणिक अनेक प्रकारचे विषाणू धुळ, प्रदूषण याच्या माध्यमातून येऊन बसतात. स्मार्टवॉचमधील रिस्ट बँड वर असणाऱ्या छिद्रात ते जाऊन बसतात.

स्मार्टवॉचची वेळोवेळी स्वच्छता केली नाही तर हेच विषाणू अप्लाय शरीराचा ताबा घेतात. त्यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळते. केवळ स्मार्ट वॉचच नव्हे तर मोबाईल, इयर बर्ड्स, टॅबलेट्स, लॅपटॉप, टीव्ही, कॉम्प्युटर, कॅमेरा, दुर्बीण यासारख्या वस्तुमधूनही मोठ्या प्रमाणात असे बॅक्टेरिया, विषाणू शरीरात प्रवेश करतात.

त्यामुळे असे बॅक्टेरिया किंवा विषाणू यांना शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी अशा वस्तूचे कव्हर वेळोवेळी स्वच्छ धुवावे. तज्ञांच्या मते ही उपकरणे नियमित स्वच्छ ठेवणे हा यावर एकमेव उपाय आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे जंतुनाशक स्प्रे आहेत. त्याचा वापर करून 99 टक्के विषाणू नष्ट करता येत. यामुळे उपकरण देखील खराब होत नाहीत आणि तुमच्या शरीराची काळजीही घेतली जाते.