‘मला भेटून उपयोग नाही’, अजित दादांनी स्पष्टच सांगितलं, रामदास आठवले काय निर्णय घेणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा रंगत आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची देखील काही जागांची मागणी आहे. त्यासाठी ते महायुतीच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. या दरम्यान त्यांनी आज अजित पवारांना संपर्क साधला तेव्हा अजित दादांनी त्यांना स्पष्टच भूमिका मांडली. त्यामुळे आता रामदास आठवले यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जोरदार घडामोडी सुरु आहेत. भाजपकडूनच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे आहेत. यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यावर आहे. असं असताना महायुतीमधील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे विधानसभा निवडणुकीसाठी जागांची मागणी करत आहेत. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षालादेखील निवडणुकीत काही जागा लढवायच्या आहेत. यासाठी ते महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांनी त्यांना स्पष्टच सांगितलं. “मला एकट्याला भेटून उपयोग नाही”, असं अजित पवारांनी रामदास आठवले यांना स्पष्टच सांगितलं
रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
“आम्ही पाच-सहा जागा मिळाव्यात असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मी अजित पवार यांना आज बोलले की, मला आपणाला भेटायचे आहे. अजित दादांनी सांगितलं की, मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसांत आपण तुमच्या जागांबद्दल फायनल करू. कोणती जागा आपल्याला सोडता येऊ शकते, यासाठी उद्या तीनही नेत्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न करतो”, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
“महायुतीला अडचणीत आण्याची आमची भूमिका नाही. आम्ही सोजवळ आहोत. समंजस आहोत. आम्हाला महायुती सोबतच राहायचे आहे. पण म्हणून आम्हला एकदम दुर्लक्ष करू नये. एवढंच आमचं म्हणणं आहे. जागावाटपात आम्हाला न्याय मिळू शकेल. मुंबईमध्ये आम्ही धारावी आणि चेंबूरची जागा मागितली आहे. या दोन पैकी कोणती तरी एक जागा आम्हाला मिळावी. मराठवाड्यामध्ये पण आमचं चागलं होल्ड आहे”, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.