शिवाजी विद्यापीठात लैंगिक छळाचा अहवाल दडपला, स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिकांचा गंभीर आरोप

| Updated on: Mar 06, 2020 | 5:14 PM

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुंनी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचा अहवाल दडपून ठेवल्याचा गंभीर आरोप विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे

शिवाजी विद्यापीठात लैंगिक छळाचा अहवाल दडपला, स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिकांचा गंभीर आरोप
Follow us on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुंनी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचा अहवाल दडपून ठेवल्याचा गंभीर आरोप विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे (Shivaji University Kolhapur). त्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. नानिवडेकर यांनी कुलगुरुंवर विद्यापीठातील महिला अत्याचाराची प्रकरणं जाणीवपूर्वक दडपल्याचा आरोप केला आहे. तसेच वेळोवेळी पत्रं देऊनही कुलगुरूंनी अहवाल खुला का केला नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

डॉ. मेधा नानिवडेकर, “विद्यापीठातील लैंगिक छळांबद्दलच्या प्रकरणांचा चौकशी अहवाल बासनात बांधून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला याची धास्ती वाटत असून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. लैंगिक छळांच्या तक्रारींचा निर्णय देण्यासाठी 90 दिवसांची कालमर्यादा आहे. त्यात गैरव्यवहार झाले आहेत. त्या गैरव्यवहाराची चौकशी करुन आलेला अहवाल पावणेचार वर्षे दडवून ठेवला जात आहे.”

मेधा नानिवडेकर यांनी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळांच्या प्रकरणांच्या अहवालाबाबत याचिकाही दाखल केली होती. मात्र, त्यानंतर विद्यापीठाने संबंधित अहवाल याचिकाकर्त्यांनाही दिला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरुंना या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यामध्येच स्वारस्य आहे हे उघड होतं, असंही नानिवडेकर म्हणाल्या.

मी याचिकाकर्ती आहे त्यामुळे चौकशी कशी केली याची माहिती मिळालीच पाहिजे, असंही मेधा नानिवडेकर यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी कुलगुरुंवर शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरु असलेल्या विद्यापीठात अशा प्रकारांना दडपून शिवाजी महाराजांच्या नावाला बट्टा लावू नका, अशी टीका केली.

Shivaji University Kolhapur