
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला प्रचंड विरोध होत आहे. वाघ्या कुत्र्या हा अस्तित्वातच नव्हता. मग त्याची रायगडावर समाधी कशाला असा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनीही केला आहे. माजी खासदार छत्रपती संभाजी आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्या हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याला ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार विरोध केला आहे. आज वाघ्या कुत्र्याला विरोध केला. उद्या महादेवासमोरचा नंदी काढा म्हणाल, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके मीडियाशी संवाद साधत होते. छत्रपती शाहू महाराजांचा खंड्या कुत्र्याचा पुतळा संगम माहुलीवर बसवला आहे, तो पण काढणार का? आजही रायगडाच्या बाजूने असलेल्या वाड्या धनगरांच्या आहेत. तोरणा किल्ला हा धानोजी धनगर यांनी शिवाजी महाराजांना गिफ्ट केलेला आहे. आज कुत्र्याला विरोध करत आहेत, उद्या महादेवासमोरचा नंदी काढा म्हणाल, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
एक छत्रपती चिथावणी देतो, तर दुसरा…
विशाळगडावर एक छत्रपती चिथावणी देतो आणि दुसरा छत्रपती तिथे माफी मागायला जातो. एक छत्रपती गादीवर असेल तर अनेक छत्रपती कसे असू शकतील?, असा सवाल त्यांनी केला. भूषण होळकर हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. धनगर समाजातील 10 लोकं सुद्धा भूषण होळकर कोण हे सांगू शकणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
जरांगेंनी शेतीपाणीबद्दल बोलावं
मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आणि लढा वेगळ्या दिशेने गेलेला आहे. मी जरांगे यांच्याबाबत सकारात्मक बोलतो. त्यांनी मोठा लढा उभा केला. पण त्यांनी शेतकरी शेती पाणी याबाबत बोलावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
तर जानकरांचे 100 आमदार असते
महादेव जानकर यांच्यासह मी कष्टकरी लोकांसोबत काम केलं. चलो राजसत्ता की और असं म्हणत आम्ही काम करत होतो. पण महाराष्ट्र पातळीवर विजय वडेट्टीवार यांच्यामुळे काम करण्याची संधी मिळाली. मराठवाड्याच्या भूमीने मला प्रेम दिलं. मी कार्यकर्ता आहे. स्वतःला मोठं मानत नाही. महादेव जानकर यांचं जीपीएस आता गंडलेलं आहे. त्यांचं जीपीएस आणि सॅटेलाईटचा संपर्क राहिलेलं नाही. त्यांचं जीपीएस गंडलं नसतं महादेव जानकर यांचे 50 ते 100 आमदार राहिले असते, असा दावा त्यांनी केला.
सत्तासुंदरीने गळ्यात हार घातल्यानंतर…
महादेव जानकर यांच्या भूमिकेमुळे समाजाचं प्रचंड नुकसान झालंय. ज्या लोकांनी महादेव जानकर यांना जपलं, पण सत्तासुंदरीने हार गळ्यात घातल्याबरोबर महादेव जानकर हे शोषित आणि वंचितांना विसरले. लक्ष्मण हाके सत्तेच्या जवळ जाईल. पण शेवटच्या घटकापर्यंत न्याय देईल. मला सत्तेत, निर्णय प्रक्रियेपर्यंत जायचं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय? ही ओबीसींची भावना आहे. कुणीही ओबीसी मुख्यमंत्री व्हावा. मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय, जनतेने निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले.