केजरीवालांचे प्रमोद सावंतांशी ट्विटयुद्ध, केंद्र-राज्यात दुफळी माजवू नका, सावंतांनी सुनावलं

| Updated on: Nov 12, 2020 | 4:57 PM

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुफळी माजवण्याचा तुमचा हातखंडा चांगलाच माहित आहे, असा टोला प्रमोद सावंतांनी लगावला.

केजरीवालांचे प्रमोद सावंतांशी ट्विटयुद्ध, केंद्र-राज्यात दुफळी माजवू नका, सावंतांनी सुनावलं
Follow us on

पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यात चांगलेच ट्विटयुद्ध रंगले आहे. केंद्र सरकारने गोव्यात लादलेल्या प्रकल्पाला नकार देण्याचा सल्ला केजरावाल यांनी दिला, तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुफळी माजवण्याचा तुमचा हातखंडा चांगलाच माहित आहे, असा टोला सावंतांनी लगावला. (Delhi CM Arvind Kejriwal and Goa CM Pramod Sawant twitter war over Save Mollem)

“अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील प्रदूषणाकडे आधी लक्ष द्यावं, नंतर गोव्याविषयी बोलावं” असा निशाणा प्रमोद सावंत यांनी साधल्यानंतर केजरीवालांनी ट्विटरवरुन त्यांना प्रत्युत्तर दिलं. “दिल्लीचे प्रदूषण विरुद्ध गोव्याचे प्रदूषण हा मुद्दाच नाही. गोवा आणि दिल्ली हे दोन्ही माझे लाडके आहेत. आपण एक देश आहोत. आपण एकत्रित काम करुन दिल्ली आणि गोवा प्रदूषणमुक्त करण्याकडे लक्ष द्यायला हवं” असं मत केजरीवालांनी ट्विटरवरुन व्यक्त केलं.

केजरीवालांच्या ट्विटला प्रमोद सावंत यांनी उत्तर दिलं. “गोव्यात प्रदूषण होणार नाही आणि राज्य प्रदूषणमुक्त राहील, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. दिल्लीतील जनतेलाही त्यांच्या सुंदर राज्यात तेच हवं असेल, याची मला खात्री आहे” असा टोमणा सावंत यांनी मारल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली.

“गोव्याचे रहिवासी रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला विरोध करत आहेत. त्यांचा आवाज ऐका आणि मोलेम वाचवा. ती गोव्याची फुफ्फुसं आहेत. केंद्र हा प्रकल्प गोव्यावर लादत आहे, हे समजू शकतो. कृपया केंद्राला ठाम नकार द्या, गोवेकरांच्या बाजूने उभे रहा आणि गोव्याला कोळशाचे केंद्रस्थान बनण्यापासून थांबवा” अशी विनंती केजरीवालांनी केली.

“रेल्वे मार्ग दुपदरीकरणा हा राष्ट्रनिर्माण करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे मोलेमला कोणताही धोका नाही आणि आम्ही गोव्याला कोळशाचे हब होण्यापासून वाचवण्याची काळजी घेऊ. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुफळी माजवण्याचा तुमचा हातखंडा ओळखून आम्ही तुमचा सल्ला नाकारतो” असे उत्तर प्रमोद सावंत यांनी दिले. (Delhi CM Arvind Kejriwal and Goa CM Pramod Sawant twitter war over Save Mollem)

“तुम्ही माझा सल्ला ऐकू नका, पण गोवेकरांचा आवाज तरी ऐका. केंद्राचे आदेश गोव्याच्या आवाजापेक्षा मोठे आहेत का?” असा सवाल केजरीवाल यांनी विचारला. “राज्य विरुद्ध केंद्र सरकार दुही माजवण्याचे काम थांबवा. आपण एक देश आहोत” असं उत्तर प्रमोद सावंत यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांवर कडक निर्बंध, पर्यावरणपूरक फटाक्यांनाही नो एन्ट्री

(Delhi CM Arvind Kejriwal and Goa CM Pramod Sawant twitter war over Save Mollem)