Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी क्षितीज प्रसादला न्यायालयाकडून दिलासा, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

| Updated on: Nov 26, 2020 | 5:39 PM

धर्मा प्रोडक्शनचा निर्माता क्षितीज प्रसाद (Kshitij Prasad) याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने त्याला 50 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर केला आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी क्षितीज प्रसादला न्यायालयाकडून दिलासा, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Follow us on

मुंबई : धर्मा प्रोडक्शनचा निर्माता क्षितीज प्रसाद (Kshitij Prasad) याचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने त्याला 50 हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर केला आहे. क्षितीज प्रसाद करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित असून, ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) नाव समोर आल्याने एनसीबीने त्याला अटक केली होती. 27 सप्टेंबरला तब्बल 27 तासांच्या चौकशीनंतर क्षितीज प्रसादला अटक करण्यात आली होती. क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती (Dharma Production’s Kshitij Prasad gets bail in drugs case).

कोर्टाच्या आदेशानुसार क्षितीज प्रसाद याला मुंबईबाहेर जाण्यासाठी तपास अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, त्याला आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. एनसीबीने क्षितीज प्रसाद याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि ड्रग्ज सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती.

एनसीबीने 26 सप्टेंबर रोजी क्षितीज प्रसादला अटक केली होती. त्याआधी एनसीबीने सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि काही लोकांना याप्रकरणी ताब्यात घेतले होते. या सर्वांवर नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अर्थात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एनसीबी अधिकारी या प्रकरणात अडकवत असल्याचा दावा

क्षितीज प्रसादने विशेष न्यायालयाकडे दाखल केलेल्या जामीन याचिकेत एनसीबी अधिकारी आपल्यावर दबाव आणून, खोटी नावे घेण्यास सांगत आहेत, असे म्हटले होते. मी नकार दिल्याने ते मला या प्रकरणात अडकवत आहेत, असा दावाही त्याने केला होता. या आधी रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांनीदेखील असाच दावा केला होता (Dharma Production’s Kshitij Prasad gets bail in drugs case).

एनसीबी कोठडीत क्षितीजचा छळ होत असून, धर्मा प्रोडक्शनशी संबधितांची आणि इतर बड्या कलाकारांची नावे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जात असल्याचा दावा सतिश मानेशिंदे यांनी केला होता. ‘न्यायाधिशांसमोर क्षितीजचा जबाब नोंदवण्यात आला. एनसीबी कोठडीत क्षितीजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले आहे. क्षितीजच्या घरातून सिगारेटची थोटके मिळाली होती. पण, एनसीबीने जबरदस्तीने त्याला गांजाचे नाव दिले. ईशा आणि अनुभवला क्षितीजविरोधात जबाब द्यायला लावला’, असे वकील सतिश मानेशिंदे यांनी म्हटले होते.

कोण आहे क्षितीज प्रसाद?

क्षितीज प्रसाद हा धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता आहे. त्याला 24 सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आला होता. एनसीबीने हे समन्स त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बजावले होते. यानंतर क्षितीज याच्या घरी 25 सप्टेंबर रोजी धाड टाकण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी क्षितीजला एनसीबी कार्यलयात बोलावले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. क्षितीज प्रसाद याला 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून क्षितीज तुरुंगातच होता.

(Dharma Production’s Kshitij Prasad gets bail in drugs case)