‘होल्ड युअर पोजीशन’चा आदेश, अवघे 21 जवान, समोर 10 हजार अफगाण… आणि घडला एक समर संग्राम

हवालदार इशर सिंग यांनी पश्तोमध्ये उत्तर दिले. त्यांची भाषा केवळ कठोरच नव्हती तर शिवीगाळही होती. ते म्हणाले, महाराजा रणजित सिंग यांची भूमी आहे. इंग्रजांची नाही आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करू.' आणि क्षणातच 'बोले सो निहाल, सत् श्री अकाल'च्या जयघोषाने सारागढी चौकी दुमदुमली.

'होल्ड युअर पोजीशन'चा आदेश, अवघे 21 जवान, समोर 10 हजार अफगाण... आणि घडला एक समर संग्राम
History of Sikh Warriors in SaragarhiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 9:08 PM

मुंबई : 12 सप्टेंबर 1897 रोजीची ती सकाळ. 8 वाजले होते. सारागढी किल्ल्यावर सेन्ट्री उभा होता. त्याने पाहिले समोरून दहा ते बारा हजारांचा जमाव येतोय. सेन्ट्रीने किल्ल्याचा हवालदार इशर सिंग यांना लागलीच माहिती दिली. झेंडे, भाले, रायफल घेऊन हजारो पठाणांचा एक गट उत्तरेकडून किल्ल्याच्या दिशेने येत आहे. मिळालेली माहिती भयंकर होती. हवालदार इशर सिंग यांनी जवळच्या फोर्ट लॉकहार्ट येथे तैनात असलेल्या ब्रिटीश अधिकारी कर्नल हॉटन याला परिस्थितीची माहिती दिली. त्यांना विचारले की ‘काय आदेश आहेत?’ कर्नल हॉटन याने हवालदार इशर सिंग यांना आदेश दिला, ‘होल्ड युअर पोजीशन’. हा आदेश येताच हवालदार सतर्क झाले. त्यांनी सैनिकांना आदेश दिला ‘युद्धाच्या तयारीत रहा.’ तासाभरात किल्ला तिन्ही बाजूंनी घेरला गेला. समोर होती दहा हजारांची अफगाणी फौज तर किल्ल्यात होते अवघे 21 सैनिक. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार त्या 21 सैनिकांनी आपली पोजीशन घेतली आणि सुरवात झाली एका महासंघर्षाला… हाच महासंघर्ष इतिहासात सारागढीची लढाई म्हणून प्रसिद्ध झाला.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात समना पर्वत रांगेचा भाग येतो. याच पर्वत रांगेत कोहाट जिल्ह्यात सारागढी गाव आहे. समना हिल्स प्रदेशामध्ये इंग्रज आणि येथील आदिवासी पश्तून यांच्यात सतत संघर्ष चालू होता. हा भाग जरी पाकिस्तानचा असला तरी 1893 पर्यंत तो अफगाणिस्तानचा एक भाग होता. परंतु, ब्रिटीशांनी पश्तूनांना अर्ध्या भागात विभाजित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांसोबत लढा लढण्याचा निर्णय घेतला. अनेक युद्धे आणि संघर्ष यामुळे पश्तून युद्धखोर बनले. पश्तूनांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इंग्रजांनी इथल्या काही भागांवर ताबा मिळवून येथील काही किल्ले मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

सुलेमान पर्वतरांगेवर दोन प्रमुख किल्ले होते. त्यातील पहिला म्हणजे गुलिस्तान आणि दुसरा समना पर्वतरांगेवरील किल्ला लॉकहार्ट. मात्र, परिस्थिती अशी की हे दोन्ही किल्ले एकमेकांना पाहता येत नव्हते. त्यामुळे या दोन किल्ल्यांमधील हेलिओग्राफिक दळणवळण करता येत नव्हते. हेलिओग्राफी हे असे एक तंत्र होते ज्यामध्ये सूर्यप्रकाश परावर्तित करून सिग्नल पाठवले जात होते. मात्र, यात अडथळा येत असल्याने इंग्रजांनी सारागढी येथे पोस्ट चौकी स्थापन केली. सारागढी एक महत्त्वाची दळणवळण चौकी होती. त्यात लूप-होल्ड तटबंदी आणि सिग्नलिंग टॉवर असलेले एक छोटे ब्लॉकहाऊस होते. त्यामुळे सारागढ़ी हे संपूर्ण प्रदेशाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे पोस्ट होते.

36 शीख रेजिमेंट…

कर्नल जे. कुक यांनी 1894 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी अंतर्गत 36 शीख रेजिमेंट तयार केली होती. समना हिल्स प्रदेशामध्ये इंग्रज आणि येथील आदिवासी पश्तून यांच्यातील संघर्ष अधिक वाढला होता. 1897 मध्ये तेथे अफगाणांचे एक बंड सुरू झाले होते. त्यामुळे ऑगस्ट 1897 मध्ये लेफ्टनंट कर्नल जॉन हॉटन याच्या नेतृत्वाखाली 36 शीख रेजिमेंटच्या पाच कंपन्या भारताच्या उत्तर-पश्चिम सरहद्दीवर पाठवण्यात आल्या. या रेजिमेंटमधील सैनिक समना हिल्स, कुराग, संगार, सहटॉप धार आणि सारागढी यासह विविध किल्ल्यांवर तैनात होते. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 1897 या दरम्यान पश्तूनांनी या प्रदेशातील किल्ले ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले. पण, ते रेजिमेंटच्या सैनिकांनी परतवून लावले होते.

3 आणि 9 सप्टेंबर रोजी आफ्रिदी आदिवासी यांनी अफगाण लोकांसह गुलिस्तान किल्ल्यावर हल्ला केला. हे दोन्ही हल्ले हाणून पाडण्यात आले. त्यामुळे त्यांनी आपले पुढील लक्ष्य सारागढी चौकीला केले. त्यावेळी सारागढी चौकीमध्ये ब्रिटीश इंडियन आर्मीच्या शीख बटालियनचे 21 शीख सैनिक तैनात होते. हवालदार इशर सिंग त्यांचे नेतृत्व करत होते. मात्र, त्यापैकी काही स्वयंपाकी होते आणि काही सिग्नलमन होते. तर, बाबा नावाचा एक गैर लढाऊ सैनिक सैन्याच्या सेवेसाठी तैनात होता. 12 सप्टेंबर 1897 हा तो दिवस. सकाळी 8 च्या सुमारास दहा हजार अफगाणी सैनिकांनी सारागढी चौकीला वेढा घातला.

‘होल्ड युअर पोजीशन’ असा आदेश

सारागढी चौकीचा शिपाई गुरुमुख सिंग यांनी हेलिओग्राफद्वारे काही हजारो सैनिक चौकीवर चाल करून येत असल्याची माहिती कर्नल हॉटनला दिली. आपल्यासाठी काय आदेश आहे याची विचारणाही त्यांनी केली. कर्नल हॉटन याने सारागडीला त्वरित मदत पाठवू शकत नाही असे कळविले. तसेच, ‘होल्ड युअर पोजीशन’ असा आदेशही त्या जवानांना दिला. कर्नलच्या आदेशानुसार सारागढी चौकीच्या सैनिकांनी शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे ठरवले. मात्र, त्याचवेळी ओरकझाईचा एक सैनिक हातात पांढरा ध्वज घेऊन चौकीकडे निघाला. त्या सैनिकाने, “आमची लढाई तुमच्याशी नाही. आमची लढाई इंग्रजांशी आहे. तुमची संख्या खूप कमी आहे. तुम्ही मारले जाल. आम्हाला शरण या. आम्ही तुमची काळजी घेऊ आणि तुम्हाला येथून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्ग देऊ” असे सांगितले. हवालदार इशर सिंग यांनी त्या ऑफरला ओरकझाईंची भाषा पश्तोमध्ये उत्तर दिले. त्यांची भाषा केवळ कठोरच नव्हती तर शिवीगाळही त्यात होती. ते म्हणाले, ही महाराजा रणजित सिंग यांची भूमी आहे. इंग्रजांची नाही आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करू.’ आणि क्षणातच ‘बोले सो निहाल, सत् श्री अकाल’च्या जयघोषाने सारागढी चौकी दुमदुमून गेली.

हवालदार इशर सिंग यांनी सिग्नलमन गुरुमुख सिंग यांना चौकीत आपापली जागा पकडण्याचे आदेश दिले. अफगाण सैनिकांना वाटले की ही छोटी चौकी जिंकणे सोपे होईल. पण, त्यांची निराशा झाली. त्यांनाही युद्धाला सामोरे जावे लागणार होते. आतील 21 सैनिकांना बाहेरून मदत मिळण्याची शक्यता तशी कमीच होती. पण, त्यांच्याजवळ होती दुर्दम्य इच्छाशक्ती. 1857 ला भारतात एक मोठे बंड झाले होते. त्यामुळे इतर कोणतेही बंड होऊ नये आणि ते बंड नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून इंग्रजांनी भारतीय सैन्याला मुद्दामहून जुनी शस्त्रे दिली होती. तर, अफगाणांकडे होती मार्टिनी हेन्री रायफल.

21 सैनिकांपैकी पहिले शहीद भगवान सिंग

उत्तर – पश्चिम सरहद्द प्रांतातील अफगाणांनी याच मार्टिनी हेन्रीची हुबेहूब नक्कल करून रायफल बनविल्या होत्या. खैबर खिंडीच्या जवळ रहाणारा आदम खेल आफ्रिदी याचा मुख्य निर्माता होता. हवालदार इशर सिंग यांनी अफगाण सैन्याची ती ऑफर धुडकावून लावली आणि काही क्षणातच महासंग्राम सुरु झाला. दोन्ही बाजुंनी गोळ्यांची बरसात सुरु झाली. समोरचा एकेक शत्रू पडू लागला. शत्रूची एक गोळी शिपाई भगवान सिंग यांच्या डोक्याला भेदून गेली. 21 सैनिकांपैकी पहिले शहीद झाले ते भगवान सिंग. तर, नाईक लाल सिंग गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतही नाईक लाल सिंग आणि हवालदार जीवा सिंग यांनी भगवान सिंग यांचा मृतदेह चौकीच्या आतील थरात नेला.

लष्करी इतिहासात शेवटपर्यंत युद्ध लढणारा योद्धा

अफगाणांनी चौकीवर तुफान हल्ला केला. चौकीचे मुख्य गेट उघडण्यासाठी दोन प्रयत्न केले गेले. पण त्यात त्यांना अपयश आले. मात्र, नंतर अफगाण सैनिकांनी भिंत पाडली. यानंतर काही ठिकाणी हातोहात मारामारी झाली. हवालदार ईशर सिंग यांनी उरलेल्या सैनिकांना आतल्या थरात माघार घेण्याचा आदेश दिला. आता आतून गोळीबार होऊ लागला. एक एक सैनिक कामी येत होता. शिपाई गुरुमुख सिंग हा तोच सैनिक होता ज्याने सिग्नलमन म्हणून हॉटनला लढाईची माहिती दिली होती. हा शेवटचा बचावकर्ता होता. सोबत हवालदार इशर सिंग हे ही प्राणपणाने लढत होते. गुरुमुख सिंग याने त्याची रायफल उचलण्याची परवानगी मागणे हा त्याचा शेवटचा संदेश होता. परवानगी मिळाल्यावर त्याने हेलिओग्राफ पॅक केले. त्याची रायफल सिग्नलिंग शेडच्या दाराकडे टेकवली. समोर दिसेल त्याच्यावर तो रायफल चालवीत होता. एक… दोन… तीन… पहाता पहाता 40 अफगाणांना त्यांनी ठार केले. त्याचा हा चौफेर मारा पाहून पश्तूनांना चौकी पेटवण्यास भाग पाडले गेले. मरता मरताही गुरुमुख सिंग याच्या मुखात “बोले सो निहाल, सत श्री अकाल!” ही घोषणा निदादत होती. आता उरले होते फक्त हवालदार इशर सिंग. त्यांनीही पराक्रमाची शिकस्त केली. पण, त्यांनाही वीरमरण आले. लष्करी इतिहासात शेवटपर्यंत युद्ध लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

सारागढीचा नाश केल्यानंतर अफगाणांनी त्यांचे लक्ष गुलिस्तान किल्ल्याकडे वळवले. परंतु त्यांना खूप उशीर झाला होता. दोन दिवसांनंतर म्हणजे 14 सप्टेंबरला दुसऱ्या ब्रिटीश भारतीय तुकडीने तीव्र तोफखाना वापरून सारागढी पोस्ट पुन्हा ताब्यात घेतली. त्यावेळी भारतीय तुकडीला उध्वस्त झालेल्या चौकीच्या आजूबाजूला अफगाण सैनिकांचे अंदाजे 600 मृतदेह आढळून आले. भारतीय तुकडीने चौकी परत ताब्यात घेतल्यानंतर सारागढीच्या भाजलेल्या विटा त्या 21 सैनिकांचे स्मारक बांधण्यासाठी वापरल्या. या 21 शीख सैनिकांपैकी बहुतांश फिरोजपूर आणि अमृतसरचे होते. त्यामुळे इंग्रजांनी त्या अमर सैनिकांसाठी अमृतसर आणि फिरोजपूर येथे गुरुद्वारा बांधले. सारागडीच्या लढाईसह त्या संपूर्ण मोहिमेतील एकूण मृत्यू हे अंदाजे 4,800 इतके होते. इंग्रजांनी युद्धात सहभागी सर्व 21 सैनिकांना मरणोत्तर इंडियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित केले. ब्रिटीश सैन्याचा हा सर्वोच्च शौर्य पुरस्कारही त्यांना देण्यात आला. भारतीय सैन्याच्या शीख रेजिमेंटची चौथी बटालियन दरवर्षी 12 सप्टेंबर रोजी सारागढी दिन म्हणून या लढाईचे स्मरण करते.

सारागडीच्या लढाईत शहीद झालेले सैनिक

हवालदार ईशर सिंग (रेजिमेंटल क्र. 165)

नाईक लाल सिंग (322)

लान्स नाईक चंदा सिंग (546)

शिपाई राम सिंग (163)

शिपाई साहिब सिंग (182)

शिपाई राम सिंग (287)

शिपाई हीरा सिंग (359)

शिपाई उत्तम सिंग (492)

शिपाई दया सिंग (687)

शिपाई जीवन सिंग (760)

शिपाई भोला सिंग (791)

शिपाई जीवन सिंग (871)

शिपाई गुरुमुख सिंग (814)

शिपाई नारायण सिंग (834)

शिपाई नंद सिंग (1221)

शिपाई भगवान सिंग (1257)

शिपाई भगवान सिंग (1265)

शिपाई सुंदर सिंग (1321)

शिपाई बुटा सिंग (1556)

शिपाई जीवन सिंग (1651)

शिपाई गुरुमुख सिंग (1733)

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.