D Day | चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं, मात्र अंत्यदर्शन न देताच दोघांचाही निरोप

हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या (Irrfan Khan and Rishi Kapoor D Day) निधनाच्या काहीच तासानंतर बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचंही निधन झालं.

D Day | चाहत्यांना भरभरुन प्रेम दिलं, मात्र अंत्यदर्शन न देताच दोघांचाही निरोप

मुंबई : बॉलिवूडसह संपूर्ण देशासाठी गेले 24 तास अत्यंत दु:खद आणि वेदनादायी ठरले. हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या (Irrfan Khan and Rishi Kapoor D Day) निधनाच्या काहीच तासानंतर बॉलिवूडचा चॉकलेट हिरो, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचंही निधन झालं. दैवदुर्विलास म्हणजे दोघांनाही कॅन्सरनेच हरवलं. एक धक्का सहन होण्यापूर्वीच बॉलिवूडला हा दुसरा धक्का बसल्याने, सर्वजण हादरुन गेले आहेत. (Irrfan Khan and Rishi Kapoor D Day)

दुर्दैवी योगायोग म्हणजे देशात लॉकडाऊन असताना दोघांचंही निधन यादरम्यानचं झालं. ज्यांनी चाहत्यांना भरभरुन आनंद दिला, त्यांनी त्याच चाहत्यांना अंत्यदर्शन मात्र दिलं नाही.

ऋषी कपूर यांना 3 ऑक्टोबर 2018 रोजी कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. तिथे 11 महिने 11 दिवस उपचार घेऊन ते परत भारतात आले होते. ते मुंबईत आल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं.

अमेरिकेवरुन परतल्यानंतर ऋषी कपूर पूर्णपणे बरे झाले असं नव्हतं. त्यांच्यावर उपचार सुरुच होते. बुधवारी त्यांना एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी उपचारादरम्यान 8 वाजून 45 मिनिटांनी ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली.

त्याआधी काल इरफान खान यांचंही उपचारादरम्यान निधन झालं. इरफान खान यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

इरफान खान आणि ऋषी कपूर यांची एकत्र भूमिका

इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन तगड्या कलाकारांनी डी डे या सिनेमात एकत्र काम केलं. निखील अडवाणी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भूमिका ऋषी कपूर यांनी केली होती. तर इरफान खान रॉ एजंटच्या रोलमध्ये होता. या सिनेमात अर्जुन रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हासन यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती.

इरफान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर डी डे सिनेमातील दोघांचा एकत्र फोटो चाहत्यांकडून शेअर केला जात आहे.

संबंधित बातम्या 

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन


Published On - 11:42 am, Thu, 30 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI