दोस्त दोस्त ना रहा! पत्नीसोबत लफडं, मित्राचा काटा काढून मृतदेह झुडपात फेकला

पत्नीसोबत मित्राचे अनैतिक  संबंध असल्याच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या करुन त्याचा मृतदेह वडाळ्याजवळच्या झुडपात फेकून देण्यात आला.

दोस्त दोस्त ना रहा! पत्नीसोबत लफडं, मित्राचा काटा काढून मृतदेह झुडपात फेकला

मुंबई : दोस्त दोस्त ना रहा…असाच काहीसा प्रकार मुंबईतील भायखळा परिसरात घडला. पत्नीसोबत मित्राचे अनैतिक  संबंध असल्याच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर हत्या करुन त्याचा मृतदेह वडाळ्याजवळच्या झुडपात फेकून देण्यात आला. गणेश पोळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी भायखळा  पोलिसांनी सुशांत साळुंखे उर्फ कालाखट्टा या आरोपीला अटक केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मयत गणेश पोळ याचे त्याचा मित्र सुशांत साळुंखेच्या पत्नीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, असा आरोप आहे. याबाबतची कुणकुण आरोपी सुशांत साळुंखेला लागली. त्यानंतर या दोघांमध्ये सतत खटके उडत होते. हे प्रकरण कायमचं मिटवायचं म्हणून सुशांतने गणेशचा काटा काढण्याचे ठरविले.

गणेश त्याच्या सहकाऱ्यासोबत 11 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजता मुंबईतील भायखळा परिसरातील बॅरिस्टर नाथ पै रस्त्यावरून जात होता. त्यावेळी सुशांत त्याची चारचाकी घेऊन आला आणि गणेशच्या आडवी लावली. त्यानंतर त्याने गणेशला आपल्या गाडीत बसवलं. तशीच गाडी पुढे नेऊन सुशांतने गणेशचा गळा आवळून चॉपरने त्याची हत्या केली. शिवाय त्याच्या डोक्यात वार केल्याने गणेशचा मृत्यू झाला.

गणेशचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच सुशांतने त्याचा मृतदेह ईस्टर्न फ्री वेवरील वडाळा परिसरातील झुडपात फेकून दिला.  याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मयत गणेश पोळ याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तपासाची चक्रं फिरवून सुशांत साळुंखेला अटक केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI