परतीच्या पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांसह विरोधकांकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी

| Updated on: Oct 16, 2020 | 8:23 AM

परतीच्या पावसामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान, तातडीनं आर्थिक मदत देण्याची विरोधकांची सरकारकडे मागणी

परतीच्या पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांसह विरोधकांकडून तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी
Follow us on

मुंबई: परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भाचा आणि कोकणच्या काही भागातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. कुठे काढणी झालेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. तर कुठे सोयाबीनला जागेवरच बुरशी लागली. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस आडवा झाला. फुलं, फळबागांचं मोठं नुकसान झालं. भात शेती पुर्णता नष्ट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर वाया गेललं पीक पाहत अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. अशावेळी मुख्यमंत्री महोदयांनी घराबाहेर पडत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याची मागणी आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. (opposition leaders calls on CM to come out and review damage)

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी करण्याची विनंती केली आहे. ‘मुख्यमंत्री महोदय घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता अतिवृष्टीमुळं झालेलं शेतकऱ्यांचे हाल ‘ऑनलाईन’ बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल’ अशा शब्दात बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यानं खरीप हंगाम पुरता वाया गेला. निसर्गानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचं चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यात केलेल्या दौऱ्यावेळी निदर्शनास आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्याबाबत तातडीनं कारवाई करा आणि शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करुन द्या, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून नुकसानाचा ऑनलाईन आढावा

परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व यंत्रणांकडून घेतला. झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं सोयाबीन, तूर, ऊस, कापूस, भूईमुग, भात अशा अनेक पिकांचं परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात अतोनात नुकसान झालं. मराठवाड्यातील उस्मानाबाद, जालना, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बीड, तर सांगली, सातारा, पुणे अशा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि कोकण, विदर्भातील काही भागात खरीपाचं पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. त्यामुळं शासनानं पंचनाम्याचा सोपस्कार न ठेवता, सरसकट मदत करावी अशी मागणी सर्वच ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं, गाळ-चिखलात लोळून धाय मोकलून रडण्याची वेळ

सांगलीत मुसळधार, कृष्णेची पातळी 34 फुटांवर, 12 राज्य मार्ग आणि 59 जिल्हा मार्ग खंडित

opposition leaders calls on CM to come out and review damage