ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

हवेतील बाष्पातून पाणी आणि ऑक्सिजन कशाप्रकारे मिळवता येईल, याविषयी मोदी आपले मत मांडताना दिसत आहेत.

ही गोष्ट खूपच धोकादायक; पंतप्रधान मोदींच्या त्या व्हिडीओवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
| Updated on: Oct 09, 2020 | 4:10 PM

नवी दिल्ली: आपल्या पंतप्रधानांना एखादी गोष्ट कळत नाही, हे सांगण्याची हिंमत त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये नाही. ही गोष्ट खूप धोकादायक असल्याचे मत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ  शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पवनचक्कीच्या तंत्रज्ञानासंदर्भात डेन्मार्कमधील एका अधिकाऱ्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिसत आहेत. (Rahul Gandhi Criticises PM Modi)

यामध्ये पवनचक्कीच्या साहाय्याने आपल्याला हवेतील बाष्पातून पाणी आणि ऑक्सिजन कशाप्रकारे मिळवता येईल, याविषयी मोदी आपले मत मांडताना दिसत आहेत. त्यामुळे किनारपट्टीच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच पवनचक्क्यांच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन उपलब्ध झाल्यास त्याच्या बाजारपेठेवर वर्चस्व मिळवता येईल. त्यामुळे एका पवनचक्कीच्या माध्यमातून उर्जानिर्मिती, पाणी आणि ऑक्सिजन असा तिहेरी फायदा मिळू शकतो, असे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे.


यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्याला याविषयी मत विचारले. तुम्ही अशाप्रकारचे तंत्रज्ञान विकसित करू शकाल का, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर डेन्मार्कमधील अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रश्नाचे आणि उत्साहाचे कौतुक केले.

याच व्हिडीओचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना काही कळत नाही, ही गोष्ट धोकादायक नाही. तर तुम्ही चुकताय, हे सांगायची हिंमत त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये नाही, ही गोष्ट अधिक धोकादायक असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘नाला गॅस’विषयीच्या वक्तव्यामुळे वादात सापडले होते. गटारामध्ये गॅसची नळी टाकून एका चहावाल्याने त्या गॅसचा वापर दुकान चालवण्यासाठी केल्याचा दावा केला होता.

संबंधित बातम्या:

मोदीजी, एकटे असताना हात हलवण्यापेक्षा तुमचं मौन सोडा: राहुल गांधी

‘पंतप्रधान मोदी निर्मनुष्य बोगद्यात कोणाला हात दाखवत होते, त्यांची तब्येत बिघडलेय का?’

(Rahul Gandhi Criticises PM Modi)