अधिकाऱ्यांनी 67 लाखांची दारु पकडली, गुंडांनी पिस्तुल रोखली

अधिकाऱ्यांनी 67 लाखांची दारु पकडली, गुंडांनी पिस्तुल रोखली

नाशिक : कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुंडांनी पिस्तुल रोखत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. या छाप्यात एक ट्रक आणि डिझायर कारसह बनावट विदेशी मद्याचे 1100 बॉक्स असा 65 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट विदेशी मद्य घेऊन एक ट्रक दमनहून नाशिकमार्गे गुजरातला जाणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी दुपारी मुंबई-आग्रा महमार्गावरील सोग्रस फाट्याजवळ सापळा रचत खेलदारी गावाजवळ एक संशयास्पद ट्रक पकडला आणि त्यात विदेशी मद्याचा साठा दिसून येताच तो ट्रक नाशिककडे घेऊन निघाले.

यावेळी ट्रकमधील आरोपींचे काही साथीदारही या ट्रकपाठोपाठ येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर हे पथक त्या कारचा शोध घेत असतानाच पिंपळगाव जवळ एका झायलो कारमधून पाच ते सहा गुंडांनी त्यांना गाठलं आणि त्यांच्यावर पिस्तुल रोखत ट्रक सोडा, नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र या अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केली. त्यामुळे स्थानिक नागरिक या ठिकाणी जमा होताच गुंडांनी इथून पळ काढला आणि काही वेळातच पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

या छाप्यात एक ट्रक आणि डिझायर कारसह बनावट विदेशी मद्याचे 1100 बॉक्स असा 65 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नसली तरी या संपूर्ण प्रकरणात दारू माफियांची मजल किती वाढली आहे हेच दिसून येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI