अवघ्या 7000 च्या बजेटमध्ये करा राजस्थान ते उत्तराखंडचा प्रवास! पाहा हिवाळ्यातील 5 बेस्ट ठिकाणं
तुम्ही दिल्लीच्या जवळ राहात असाल किंवा त्या बाजूला फिरायला जाणार असाल तर दिल्लीच्या आसपास अशी अनेक उत्तम ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही 7000 रुपयांच्या बजेटमध्ये फिरू शकता. या पर्यायांबद्दल जाणून घ्या.

हिवाळ्याचा सीजन आला असून अनेक सुट्ट्या या आगामी महिन्यात आहेत. त्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर हा लेख तुमच्याचसाठी आहे. तुम्हाला फिरायला जायचं आहे पण बजेट कमी आहे तर तुम्ही बरोबर जागी आला आहात. कारण आम्ही तुमच्यासाठी काही कमी बजेटवाल्या उत्तम अशा फिरण्याच्या जागा घेऊन आलो आहोत. या जागा दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या आहेत. तुम्ही फक्त ७ हजारात तुमची पूर्ण ट्रिप प्लॅन करू शकता. कसं ते जाणून घ्या.
पुष्कर, राजस्थान
पुष्कर हे राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील अरवली पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले एक प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. तिथे अध्यात्म, इतिहास आणि संस्कृतीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. तिथे तुम्ही पुष्कर सरोवर, भगवान ब्रह्मदेवांचे एकमेव मंदिर, मान महाल, वराह मंदिर आणि पुष्कर बाजार यांचा समावेश होतो. दिल्लीहून पुष्करला जाण्यासाठी तुम्ही अजमेरपर्यंत ट्रेनने प्रवास करू शकता आणि त्यानंतर स्थानिक बस किंवा खाजगी रिक्षाने पुढे जाऊ शकता. या संपूर्ण प्रवासासाठी सुमारे ७ ते ८ तासांचा वेळ लागतो.
नीमराणा, राजस्थान
राजस्थानमधील आणखीन एक जागा म्हणजे नीमराणा. नीमराणा हे कोटपुतली-बहरोड जिल्ह्यात आहे. नीमराणा किल्ल्याचे सौंदर्य खरोखरच पाहण्यासारखे आहे. याव्यतिरिक्त, तिजारा किल्ला, सिलीसेर तलाव, लेपर्ड ट्रेल आणि अलवरमधील सिटी पॅलेस ही ठिकाणे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणे आहेत. दिल्लीहून नीमराणाला जाण्यासाठी तुम्ही रेवाडीपर्यंत बस किंवा ट्रेनने प्रवास करू शकता. तिथून नीमराणा अवघ्या ३०-४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला कार चालवायला आवडत असेल, तर तुम्ही थेट कारनेही येथे पोहोचू शकता.
लॅन्सडाउन, उत्तराखंड
उत्तराखंडमधील लॅन्सडाउन अत्यंत कमी किमतीत एक आलिशान अनुभव देते. जर तुम्ही ऋषिकेश, हरिद्वार किंवा नैनितालसारख्या नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त दुसरीकडे कुठे जात असाल तर तुमच्या प्रवासाच्या यादीत लॅन्सडाउनचा नक्कीच समावेश करा. दिल्लीपासून येथे पोहोचण्यासाठी साधारण ७ ते ८ तास लागतात. येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, ज्यामध्ये टिप एन टॉप पॉइंट , भीम पकोडा,, भुल्ला ताल , श्री तारकेश्वर धाम मंदिर आणि गढवाली संग्रहालय यांचा समावेश होतो.
ओरछा, मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात, बेतवा नदीच्या काठी वसलेले ओरछा हे शहर बुंदेला राजवंशाचा ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखले जाते. इतिहासप्रेमींसाठी दिल्लीच्या आसपास यापेक्षा उत्तम ठिकाण दुसरे असू शकत नाही. हे ठिकाण राजधानीपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर आहे. प्रमुख आकर्षणांमध्ये जहांगीर महाल, बेतवा नदीचा किनारा, राम राजा मंदिर, चतुर्भुज मंदिर, ओरछा किल्ला आणि वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो.
अमृतसर, पंजाब
पंजाबची खाद्य-राजधानी असलेले अमृतसर म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. हे शहर तंदूरमध्ये शिजवलेले पदार्थ, पिंडी छोले, अमृतसर कुल्चा आणि विविध प्रकारच्या नानसाठी प्रसिद्ध आहे. खाद्यपदार्थांशिवाय, येथे तुम्ही सुवर्ण मंदिर, वाघा-अटारी सीमा, गोविंदगड किल्ला, महाराजा रणजित सिंग संग्रहालय, रामबाग आणि हॉल बाजार यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.