ATM वापरताना या गोष्टी सर्वात आधी पाहा, अन्यथा पैसे गमावून बसाल

एटीएमचा वापर आपण सगळेच मोठ्या प्रमाणात वापर करतो. पण ATM च्या माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकारही फार वाढताना दिसत आहे. त्यासाठी नक्की काय काळजी घ्यावी आणि ATM मध्ये पैसे काढायला जाताना नक्की काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

ATM वापरताना या गोष्टी सर्वात आधी पाहा, अन्यथा पैसे गमावून बसाल
ATM Safety Tips
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 23, 2025 | 6:55 PM

आजच्या डिजिटल युगात जवळपास सगळेचजण बँकेची कामे किंवा पैशांबाबत कोणतेही कामं असतील तर ती शक्यतो ऑनलाइनच करतात. तरीही, कधीकधी अशी परिस्थिती उद्भवते की एखाद्याला एटीएममध्ये जावे लागते. उदाहरणार्थ, जर तुमचे ऑनलाइन बँक खाते काही कारणास्तव उपलब्ध नसेल, किंवा तुमच्याकडे ऑनलाइन बँकिंग सेवेची सुविधा नसेल, तर एटीएम पैसे काढण्याचा किंवा जमा करण्याचा सर्वात सोपा मार्ग बनतो. परंतु आजकाल एटीएम वापरताना, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून कोणीही तुमच्या एटीएम कार्डचा गैरवापर करू शकणार नाही. रिझर्व्ह बँकेने देखील एक निर्देश जारी केला होता की आणि म्हटले आहे की एटीएम वापरताना तुम्ही काळजी घ्यावी, अन्यथा तुम्ही फसवणुकीचे बळी होऊ शकता. चला जाणून घेऊयात त्या कोणत्या गोष्टी आहेत ते.

1) एटीएमची सुरक्षा तपासा
जेव्हा तुम्ही पैसे काढायला जालं तेव्हा आधी ATM नीट तपासा. अनेकवेळा हॅकर्स आणि क्लोनिंग करणारे एटीएममध्ये छेडछाड करतात आणि त्यात क्लोनिंग डिव्हाइस बसवतात जेणेकरून वापरकर्त्याचे कार्ड क्लोन करता येईल आणि पैसे काढता येतील. अशा परिस्थितीत, एटीएममध्ये कोणतीही समस्या नाही किंवा त्यात छेडछाड झाली आहे का याची खात्री करण्यासाठी तुम्ही त्याचा कीपॅड नीट तपासला पाहिजे.

2) तुमचे एटीएम कार्ड इतर कोणालाही वापरू देऊ नका
तुम्हाला ही एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही तुमचे एटीएम कार्ड स्वतः वापरावे. कधीकधी वृद्ध लोक किंवा कमी शिक्षित महिला त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीची मदत घेतात, परंतु असे करणे म्हणजे समोरच्याला लुटण्याची संधी देण्यासारखे ठरू शकते. जर अत्यंत आवश्यक असेल तर तुम्ही एटीएम गार्डची मदत घेऊ शकता किंवा तुमच्यासोबत कुटुंबातील एखाद्या सदस्यालाही घेऊ शकता. परंतु सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे शक्यतोवर, एटीएम कार्ड इतर कोणालाही देऊ नका.

3) एटीएम कार्डचा पिन नंबर पाठ ठेवा अन् तो टाकताना आजुबाजूलाही लक्ष ठेवा
जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला किंवा जमा करायला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या कार्डचा पिन नंबर कीपॅडवर टाकता. अशा परिस्थितीत, लक्षात ठेवा की तुमच्या जवळ दुसरी व्यक्ती असो वा नसो, दुसऱ्या हाताने एटीएम पिन लपवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा हॅकर्स कॅमेरा बसवून किंवा मोबाईचा वापर करून कार्डचा पिन चोरतात आणि नंतर कार्ड क्लोनिंगद्वारे तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

4) एटीएम मशीनमधील लाईट आहे का ते तपासा
जेव्हा जेव्हा तुम्ही एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे हिरवी किंवा पिवळी लाईट दिसते. जर ही लाईट दिसत नसेल तर एटीएम वापरणे टाळा. अशा परिस्थितीत, एटीएममध्ये काही छेडछाड झाली असण्याची शक्यता असते.

5) एटीएम मशीनमध्ये स्किमर आहे का ते तपासा
एटीएम मशीनमध्ये स्किमर आहे का ते तपासा आणि जर तुम्हाला वाटत असेल की मशीनमध्ये स्किमर आहे तर ते वापरू नका

6) तुमचा एटीएम पिन बदलत राहा
तुम्ही वेळोवेळी तुमचा एटीएम पिन नंबर बदलत राहावा. बँक देखील बऱ्याचदा तुम्हाला हे करण्याचा सल्ला देते. एकच पिन नंबर जास्त काळ ठेवणे सुरक्षित मानले जात नाही. म्हणून, एटीएम पिन बदलत राहा आणि कोणत्याही विशिष्ट पॅटर्न किंवा समान अंकांसह पिन बनवू नका. पिनमध्ये वेगवेगळे अंक वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते, ज्याचा अंदाज इतर कोणीही सहजपणे घेऊ शकत नाही, उदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे पहिले किंवा शेवटचे चार अंक, एकत्रितपणे 4 शून्य (0000) किंवा एकत्रितपणे 1 अंक चार वेळा जसं (1111), असे पिन कधीही वापरू नका.