गरबा खेळताना मेकअप होणार नाही खराब! दांडिया नाईटला घामातही मेकअप टिकवण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स
Makeup tips: नवरात्रीत गरबा आणि दांडिया नाईटसाठी बहुतेक जणी खास मेकअप करतात. मात्र, सतत नाचताना घामामुळे मेकअप खराब होण्याची भीती असते. अशावेळी मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी या खास टिप्स नक्की फॉलो करा.

नवरात्रीत गरबा आणि दांडिया नाईटचा आनंद घेताना प्रत्येकालाच आपला लूक आकर्षक आणि परफेक्ट असावा असं वाटतं. यासाठी खास पारंपरिक कपडे, दागिने आणि मेकअप केला जातो. मात्र, तासन् तास गरबा खेळताना घामामुळे फाउंडेशन पसरणं, काजळ पुसलं जाणं किंवा मेकअपचा बेस खराब होणं अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे वारंवार टचअप करण्याची वेळ येते. अशावेळी मेकअप दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमचा लूक फ्रेश आणि सुंदर दिसू शकतो.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावा
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला थंडावा देण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. मात्र, बर्फ थेट त्वचेवर घासण्याऐवजी तो मऊ कापडात गुंडाळून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची सूज किंवा लालसरपणा काही काळ कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर चेहरा स्वच्छ करून मेकअपला सुरुवात करा.
एलोव्हेरा जेलचा वापर करा
त्वचेला एलोव्हेरा जेल सूट होत असेल, तर मेकअप करण्यापूर्वी त्याचा पातळ थर लावू शकता. जेल पूर्णपणे सुकल्यानंतर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर त्वचेत व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर पुढील मेकअप करा. यामुळे मेकअपचा बेस अधिक एकसारखा दिसण्यास मदत होऊ शकते. चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा
मेकअप करण्यापूर्वी फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा. त्यामुळे त्वचेवरील धूळ, तेल आणि घाण निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार हलकं मॉइश्चरायझर लावा. ऑइली त्वचा असल्यास ऑइल-फ्री मॉइश्चरायझर निवडा.
प्रायमर आणि वॉटरप्रूफ उत्पादने वापरा
मेकअपचा बेस दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रायमरचा वापर करा. ऑइली त्वचेसाठी मॅटिफायिंग प्रायमर उपयुक्त ठरू शकतो. तसेच काजळ, आयलायनर आणि मस्कारा यासारखे प्रोडक्ट वॉटरप्रूफ किंवा स्मजप्रूफ वापरा. यामुळे घामामुळे डोळ्यांचा मेकअप पसरण्याची शक्यता कमी होते.
हलकं फाउंडेशन आणि ट्रान्सलुसेंट पावडर वापरा
दांडिया नाईटसाठी चेहऱ्यावर फाउंडेशनचे अनेक थर लावण्याऐवजी हलकं, लाँग लास्टिंग आणि स्वेट रेसिस्टेंट फाउंडेशन वापरा. स्पंजच्या मदतीने ते व्यवस्थित ब्लेंड करा. त्यानंतर नाक, कपाळ आणि हनुवटी या भागांवर थोडी ट्रान्सलुसेंट पावडर लावा. यामुळे अतिरिक्त तेल कमी करण्यास आणि मेकअप सेट होण्यास मदत होऊ शकते.
शेवटी सेटिंग स्प्रे लावा
मेकअप पूर्ण झाल्यानंतर लॉन्ग-लास्टिंग सेटिंग स्प्रे वापरा. यामुळे मेकअप अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होते. गरबा खेळताना घाम आल्यास चेहरा टॉवेलने किंवा रुमालाने घासून पुसण्याऐवजी मऊ टिश्यूने हलक्या हाताने तो टिपून घ्या. वारंवार चेहऱ्याला हात लावणंही टाळा. त्यामुळे मेकअप खराब होण्याची शक्यता कमी होईल.
